‘नवी मुंबई महापालिका सेवा विनिमय 2026’ स्थायी समिती सभेत मंजूर
नवी मुंबई :महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 465 (1 ब ते ल ) नुसार तयार करण्यात आलेले नवी मुंबई महानगरपालिका सेवा विनिमय 2026 आज झालेल्या पालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सुधारणा आणि सूचनांसह मंजूर करण्यात आले. सभागृह नेते तथा स्थायी समितीचे सदस्य सागर नाईक यांनी या संबंधीचा ठराव मांडला होता. समिती सदस्यांच्या सूचनासह हा ठराव अंतिम मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. नवीन सेवा विनिमय नुसार महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले आहे. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अशोक पाटील होते.
महापालिका अधिनियमानुसार आपले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सेवा विनिमय स्थायी समितीच्या माध्यमातून करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असावी.
प्रशासन शिस्त, पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि नैसर्गिक न्याय या तत्त्वांवर हे सेवा विनिमय आधारित आहेत. सुरक्षा ठेव आणि आर्थिक उत्तरदायित्व, रजा नियम व संचय मर्यादा, सेवा कालावधी व निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, शिस्त व विभागीय चौकशी प्रक्रिया, प्रवास व दैनंदिन भत्ता संरचना, भविष्य निर्वाह निधी योगदान व्यवस्था, आचारसंहिता व हितसंबंध संघर्ष नियंत्रण आणि प्रशासनिक अहवाल व निरीक्षण प्रणाली अशा बाबींचा या सेवा विनिमय मध्ये समावेश आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेचे अनुभवी कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा महापालिका आणि पर्यायाने शहर हितासाठी होत नाही. या शहराबरोबर नाळ जुळलेल्या अधिकाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.
आजच्या घडीला स्थानिक प्रशासनातून एकही उपायुक्त दर्जाचा अधिकारी महापालिकेत नाही अशी परिस्थिती असल्याचे सभागृह नेते सागर नाईक म्हणाले. अनुभवाची ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शहर हित आणि शहराच्या विकासासाठी व्हावा यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सेवाकाळ वाढवून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचे प्रस्तावित केल्याची माहिती सागर नाईक यांनी दिली.
महापालिका अधिनियमानुसार अशा प्रकारचे सेवा विनिमय करण्याचे अधिकार स्थायी समितीला असून महासभेकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. महासभेमध्ये या सेवा विनिमयवर चर्चा होऊन सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी आपली मते नोंदवू शकतात. ठोक मानधन पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची वनमंत्री नामदार गणेश नाईक यांची भूमिका असून या कामगारांच्या हिताचा प्रस्ताव लवकरच आणण्यात येईल, अशी ग्वाही देखील सागर नाईक यांनी यावेळी दिली.
नोकर भरती नियम, अर्हता, आकृतीबंध या बाबींमध्ये देखील सुधारणा करण्यात येणार असून नवी मुंबईतील रहिवाशांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे धोरण राहील, असे सागर नाईक यांनी नमूद केले.
सेवा विनिमय विषयी आपले मत मांडताना सदस्या स्वाती गुरखे यांनी प्रसुती रजा सहा महिन्यांपेक्षा अधिक किमान नऊ महिने मिळावी अशी सूचना केली.
जमाखर्चाचे अंदाज सादर…
प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आज स्थायी समितीला महापालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे सन 2025-2026 चे सुधारित आणि सन 2026-2027 चे मूळ अंदाज सादर केले. प्रशासनाच्या वतीने दिलेले उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज विचारात घेऊन स्थायी समिती अर्थसंकल्प तयार करेल, अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली. पालिकेच्या सर्व विभागांचा लेखाजोखा घेतल्यानंतर शहर हिताचा अर्थसंकल्प तयार करून तो सर्व साधारण सभेपुढे सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.





