विदर्भाच्या राजधानीत साकारणार आधुनिक ‘लोकशाहीचे मंदिर’; २०२८ पर्यंत नागपूरचे विधानभवन पालटणार कायापालट!
विशेष प्रतिनिधी:नागपूरच्या ऐतिहासिक भूमीवर आता आधुनिकतेची मोहोर उमटणार आहे. १९१२-२० च्या जुन्या वास्तूच्या जागी आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा नवीन विधानभवन इमारतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२८ पर्यंत या भव्य प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, यासाठी सुमारे १,००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या नवीन संकुलात काय असेल खास?
प्रचंड आसनक्षमता: विधानसभेत ४००, विधान परिषदेत १२० तर मध्यवर्ती सभागृहात ७०० सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल.
भव्य आराखडा: ६२,९२४ चौरस फुटांच्या क्षेत्रफळात पसरलेले ४ मजली मुख्य संकुल (ए, बी आणि सी ब्लॉक).
अद्ययावत सोयी: लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र समिती कक्ष, प्रशासकीय इमारत आणि पत्रकारांसाठी विशेष कक्षाची सोय.
मुंबई-पुणे प्रवासासाठी ‘गेमचेंजर’ मार्ग
केवळ नागपूरच नव्हे, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ‘नेरळ ते शिरूर’ या नवीन महामार्गाला या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. रायगडच्या कर्जत-नेरळपासून सुरू होणारा हा मार्ग थेट पुणे-अहिल्यानगर महामार्गाला जोडला जाईल. यासोबतच पुणे-शिरूर दरम्यान ६ पदरी उन्नत (Elevated) मार्ग उभारण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.




