इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजलेला आहे. आपल्या केंद्र सरकारने देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी याचा भरपूर साठा आहे याची ग्वाही दिली आहे. एवढे सर्व सांगितल्यावरही आपल्या देशातील जनतेला या आदेशाचा अर्थ का कळत नाही, हे आम्हाला समजेनासे झालेले आहे.
व्यापारी आणि औद्योगिक उद्योगांसाठी सिलेंडर मिळणार नाहीत असा आदेश सरकारने काढला होता. या आदेशाला अनुसरून जनतेने धावपळ न करता शांतपणे आपले व्यवहार पार पाडणे गरजेचे होते. पण भविष्यकाळातील तरतूद म्हणून जनतेने साठवणूक सुरू केल्यामुळे देशभर गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर न मिळाल्यामुळे मोठमोठ्या शहरांतील अनेक उपहारगृहांना आपल्या अनेक आवडत्या पदार्थांना कात्री लावावी लागली आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या देशातील जुगाड हॉटेल मालकांनी पटापट लाकडावर चालणाऱ्या चुली बनवून घेतल्या आहेत. आपण जेव्हा बाहेरगावी फिरतो तेव्हा आपल्याला अनेक ठिकाणी ‘चुलीवरच्या जेवणाचे’ फलक लावलेले दिसतात, कारण चुलीवरचे जेवण अधिक स्वादिष्ट असते असा समज आहे. आता सरकारने अधिकृतपणे जाहीर आदेश काढला आहे, ज्यामुळे यापुढे रॉकेलचा उपयोग करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासोबत कोळसा वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
खरं तर फार दिवस झालेले नाहीत; साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वीपर्यंत जवळजवळ प्रत्येक घरात रॉकेलचा उपयोग करून स्टोव्हवर अनेक पदार्थ तयार करण्यात येत असत. रॉकेलचा तो मनाला भावणारा अत्यंत आवडीचा सुगंध आता पुन्हा दरवळू लागेल, तसेच रॉकेलचेही भाग्य या निमित्ताने उजळून निघेल. त्यासोबतच कोळशाचा उपयोग करून त्यावर पोळ्या तयार करणे किंवा पाण्याच्या बंबात लाकडाचा उपयोग करून पाणी गरम करणे, कोळशावर पोळ्या फुगवणे, भाकरी भाजणे हा प्रकार नव्या पिढीला अजिबात माहीतच नाही. पण जळाऊ लाकडे, कोळसा यासोबतच केरोसीन म्हणजे रॉकेल किंवा सॉ-मिलमधला भुसा यांच्या उपयोगाने आपले जेवण तयार होत असे.आता तर खेड्यापाड्यातही गॅस पोहोचलेला आहे. पण पूर्वीच्या काळी कापसाच्या झाडाच्या वाळलेल्या काड्या म्हणजे ‘पराठ्या’ किंवा तुरीच्या वाळलेल्या काड्या म्हणजे ‘तुराट्या’ यांचा उपयोग करून चहापासून संपूर्ण भोजनापर्यंत जे जे पदार्थ तयार करण्यात येत असत, त्याची ओरिजिनल चव आता आपल्याला चाखायला मिळेल.
अमेरिकेने इराणबरोबर युद्ध सुरू करून भारतातील जनतेला त्या सुंदर सुवासाच्या जेवणाची पुन्हा प्रचिती आणून देण्याचे दिवस दाखवल्याबद्दल आपण अमेरिकेचे आभारच मानले पाहिजेत. त्यापेक्षाही इराणने तेलाची जहाजे रोखून धरल्यामुळे आपल्या जनतेला आपण पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल याच्याशिवायही राहू शकतो, हे आता समजून येणार आहे.
इराणने म्हटले आहे की, हे युद्ध आमच्या अटी मान्य केल्यानंतर आम्ही थांबवू. त्या अटी अमेरिका अजिबात मान्य करणार नाही, म्हणजेच आता पुन्हा आपल्याला बैलगाड्या सुरू कराव्या लागतील. सध्या बिचार्या बैलांचा कोणीच विचार करत नाही, त्यामुळे पुन्हा ‘खिल्लारी’ बैलांच्या जोड्या शेतकऱ्यांच्या घरात उभ्या राहिलेल्या दिसतील. सध्याच्या महागड्या गॅसपेक्षा फुकट मिळणाऱ्या इंधनातून पुन्हा खेड्यापाड्यात स्वयंपाक तयार करता येऊ शकेल. शहरात थोडा इंधनासाठी जास्त खर्च झाला तरी आरोग्यदायी जीवनासाठी आपण त्याचा स्वीकार केलाच पाहिजे.
त्यामुळे आता पुन्हा धावपळ कमी होईल आणि दोन वेळचे सुवासिक जेवण मिळू शकेल. आता तर सरकारनेही तशी परवानगी दिल्यामुळे जळाऊ लाकडालाही भाव मिळेल, काळा कोळसा ही जळता जळता पांढरा होईल. रॉकेलच्या तेलालाही बऱ्याच दिवसानंतर चांगले दिवस येतील. जीवनातील मुख्य आनंद सर्वांना पुन्हा अनुभवता येईल; हा इराण आणि अमेरिकेतील युद्धाचा आपल्या दृष्टीने झालेला ‘सुपरिणाम’ आहे. ही पुरातन भारतीयांची खूण आहे, आपण याचे स्वागतच केले पाहिजे.



