नवी मुंबई

रबाळे पोलिसांचे मोठे ‘कोंबिंग ऑपरेशन’; देशी बनावटीच्या पिस्तुलासह २० आरोपींवर गुन्हे दाखल

नवी मुंबई (अनंतकुमार गवई):नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी (११ मार्च) रात्री उशिरा मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार राबवण्यात आलेल्या या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, दारू आणि गुटखा विक्री करणाऱ्या एकूण २० आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
​विविध भागात एकाच वेळी धाडी
परिमंडळ-०१ चे पोलीस उप-आयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये रबाळे एमआयडीसी हद्दीतील दिघा, ईश्वरनगर, विष्णुनगर, रामनगर, यादव नगर, ठाणे-बेलापूर रोड आणि एमआयडीसी टीटीसी इंडस्ट्रियल एरिया यांसारख्या संवेदनशील भागात पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेत ४ पोलीस निरीक्षक, १४ पोलीस अधिकारी आणि १०९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा सहभागी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत अनेक अवैध धंद्यांवरील करण्यात आलेल्या कारवाईत
​शस्त्रसाठा: एका आरोपीकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत कारवाई केली.
​अंमली पदार्थ: एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत ड्रग्ज सेवन आणि बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल.
अवैध दारू विक्री आणि प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई. यासोबत
​३३९ वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ७२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
​ हॉटेल व लॉजेसची तपासणी, १५ फरार आरोपींची धरपकड आणि ५ वॉरंटमधील ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या आदेशानुसार करण्यात आली. रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे, पोलीस निरीक्षक कल्पना जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.
​अवैध धंदे आणि गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची मोहीम यापुढेही सातत्याने राबवण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *