टॉप स्टोरी महाराष्ट्र

निवडणूक आयोगाचा ‘अहवाल’नामा: राहुल नार्वेकरांवरील कारवाई कोल्ड स्टोरेजमध्ये?

​मुंबई, विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगलेल्या राजकीय नाट्याचा अंक आता एका रंजक वळणावर येऊन ठेपला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी, राज्य निवडणूक आयोग सध्या ‘अहवालाच्या खेळात’ अडकल्याचे चित्र दिसत आहे.

​जानेवारी महिन्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. आप, जनता दल आणि सपा या पक्षांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते, तर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने त्यांच्यावर थेट गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, दोन महिने उलटूनही निवडणूक आयोगाने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

​चहल यांची निवृत्ती आणि अपूर्ण ‘मिशन’

या प्रकरणाचा पेच तत्कालीन मुख्य निवडणूक निरीक्षक आणि माजी गृहसचिव इक्बालसिंग चहल यांच्यामुळे अधिक वाढला आहे. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यापूर्वीच चहल ३० जानेवारी रोजी निवृत्त झाले आणि लगेचच त्यांची वर्णी मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिपच्या अध्यक्षपदी लागली. आयोगाच्या मते, चहल यांनी अहवाल सादर न केल्यामुळे ही कारवाई लांबणीवर पडली आहे.

​प्रशासकीय गोंधळ की जाणीवपूर्वक दिरंगाई?

विशेष म्हणजे, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती ‘प्रशासकीयदृष्ट्या अनुचित’ असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही, केवळ मुख्य निरीक्षकांचा अहवाल नाही, हे तांत्रिक कारण पुढे करून कारवाईची टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे.

​आता चेंडू इतर निरीक्षकांच्या कोर्टात

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे की, चहल यांनी अहवाल दिला नसल्याने आता त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिजीत घोरपडे, अजय पवार आणि जगन्नाथ विरकर या तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या निरीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या नव्या अहवालानंतरच नार्वेकरांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *