ST प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची खैर नाही! मंत्री प्रताप सरनाईक यांचा परळ डेपोत ‘राडा’; रिकाम्या बाटल्या पाहून अधिकाऱ्यांना भरले कापरं
मुंबई | विशेष प्रतिनिधी:तुम्ही एसटीने प्रवास करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसटीचे चालक आणि वाहक चक्क दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बस स्थानकावर अचानक छापा टाकला आणि तिथे जे दिसलं, ते पाहून मंत्र्यांचा पारा सातव्या अस्मानावर चढला.
काय घडलं परळ आगारात?
मंत्री सरनाईक यांनी कोणताही पूर्वसूचना न देता परळ डेपो गाठला. चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात (Rest Room) जाताच मंत्र्यांना तिथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसला. इतकंच नाही, तर काही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मद्याचा उग्र वास येत होता. या गंभीर प्रकारामुळे मंत्र्यांनी तिथेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्वांसमोर ‘झाडाझडती’ घेतली.
मंत्र्यांचा कडक इशारा: “आता थेट बडतर्फ करणार!”
विश्रांतीगृहाची अवस्था पाहून संतप्त झालेले सरनाईक कडाडले, “प्रवासी तुमच्यावर विश्वास ठेवून प्रवास करतात आणि तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय? हे खपवून घेतलं जाणार नाही!” त्यांनी ऑन द स्पॉट खालील मोठे निर्णय घेतले आहेत:
तातडीचे निलंबन: जे कर्मचारी मद्यधुंद आढळले, त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश.
ब्रेथ ॲनालायझर अनिवार्य: आता प्रत्येक चालकाला ड्युटीवर जाण्यापूर्वी ‘फुंक’ मारावीच लागणार. चाचणी पॉझिटिव्ह आली की नोकरी धोक्यात!
बडतर्फीची टांगती तलवार: चौकशीत दोषी आढळल्यास कर्मचाऱ्याला थेट सेवेतून काढून टाकले जाईल.
अधिकाऱ्यांवरही पडणार संक्रांत!
मंत्री केवळ कर्मचाऱ्यांवर थांबले नाहीत, तर त्यांनी सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या (Vigilance) अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. “तुमचं लक्ष कुठे आहे? अधिकारी झोपले आहेत का?” असा सवाल करत त्यांनी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्वच्छता आणि सोयीसुविधांचाही घेतला आढावा
दारूच्या प्रकरणासोबतच सरनाईक यांनी आगारातील प्रसाधनगृहे, बसेसची दुरवस्था आणि स्वच्छतेची पाहणी केली. प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीत सुधारणा झाली नाही, तर अधिकाऱ्यांनी कारवाईला तयार राहावे, असा ‘अल्टिमेटम’च त्यांनी दिला आहे.




