उल्हासनगर

उल्हासनगर कॅंप ४ बाजारपेठेतील रस्त्याचे होणार रुंदीकरण ; वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा !

उल्हासनगर , दि . ११ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ४ ओ टी सेक्शन ते व्हिनस चौक या मुख्य बाजारपेठेत सतत होणारी तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेता हा रस्ता विकास आराखड्यानुसार (डी.पी.) रुंद करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार कॅंप ४ ओटी सेक्शन ते व्हिनस चौक या बाजारपेठेतील रस्ता सुमारे १८ मीटर (सुमारे ६० फूट) रुंदीचा प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे हा रस्ता सध्या केवळ सुमारे ३० फूटांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून कॅंप क्र. ४ व ५ मधील नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय, वाहतूक कोंडीमुळे परिसरात वायू प्रदूषणाचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत . काही दुकानदारांनी लोखंडी जाळ्या लावून फुटपाथवरही अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी लक्षात घेता हा रस्ता किमान ६० फूट रुंदीचा होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेत दुकानदारांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आगामी काही दिवसांत या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे .
दरम्यान, व्यापारी संघटनेचे जगदीश तेजवानी यांनी सांगितले की, बाजारपेठेत ६० फूट रुंदीचा रस्ता होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी आधी सुमारे १५० दुकानदारांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे यांनी सांगितले की, मुख्य बाजारपेठेतील रस्ता विकास आराखड्यानुसार ६० फूट रुंदीचा आहे. नगररचना विभागाकडून रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणे हटवण्यात येतील आणि त्यानंतरच रस्त्याचे रुंदीकरण होईल.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *