उल्हासनगर , दि . ९ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील पॅनल ११ मध्ये नारायणदास हॉस्पिटलच्या जवळ एका नशेडी युवकाने कोणार्क कंपनीत सफाई कामगार असलेल्या महादु जगताप याची चाकुने ३२ वार करुन निर्घुण हत्या केल्याची घटना घडली असुन आरोपी दुर्गेशकुमार गुप्ता या नशेडी युवकाला स्थानिकानी पकडुन पोलिसांच्या हवाली केले आहे . या घटनेमुळे कोणार्क कंपनीच्या सर्व सफाई कामगारानी काम बंद आंदोलन करुन सदर घटनेचा निषेध केला आहे .तर आपल्या पतीची हत्या झाल्याने महादु जगताप याच्या पत्नीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडल्याने या दुहेरी हत्येने व आत्महत्येने उल्हासनगर हादरल आहे.
उल्हासनगर शहरात महापालिकेने पॅनल ११ व १२ मध्ये सफाई करण्याचे काम कोणार्क कंपनीला दिले आहे .याच कोणार्क इंव्हायरो कंपनीत शहाड गावठण उल्हासनगर १ येथे राहणारा महादु जगताप हा सफाई करण्याचे काम करत होता. तो आज ही नेहमी प्रमाणेच सकाळी पॅनल क्र . ११ मधील माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घराजवळ असलेल्या नारायणदास हॉस्पिटल शेजारी आनंद आईस्क्रिम जवळ सफाई करण्याचे काम करत असताना त्याच परिसरात राहणारा दुर्गेशकुमार गुप्ता या नशेडी युवका सोबत वाद झाला.
याच वादातुन दुर्गेशकुमार याने जवळ असलेल्या चाकुने महादु जगताप याच्यावर सपासप ३२ वार केले . या हल्ल्यात महादु याचा जागीच मृत्यु झाला आहे. तेव्हा स्थानिकानी नशेडी दुर्गेश याला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले असुन महादु यांचे शव येथील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता तेथे त्याच्या पत्नीने पतीचे शव बघतात तिने ही घरी जावुन गळफास घेवुन आपली जीवनलिला संपवली आहे. या दुहेरी हत्येने व आत्महत्येने उल्हासनगर हादरल असुन पोलिसानी आरोपी नशेडी दुर्गेशकुमार गुप्ता याला अटक केली असल्याची माहीती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तर महादु याचे दोन मुल उघड्यावर आली आहेत. तर या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असुन या गुंह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत. कोणार्क कंपनीतील सर्व कामगारानी दोन दिवस आपले काम बंद ठेवले असुन महादु याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप गायकवाड यांनी केली आहे.



