अजित पवारांच्या अपघाताचं सत्य ‘दडपलं’ जातंय का? रुपाली ठोंबरे-पाटलांचा तो इशारा आणि वाढतं गूढ!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला दिवस सरत आहेत, पण त्या भीषण रात्री नेमकं काय घडलं, याचं उत्तर मिळण्याऐवजी फक्त नवनवीन प्रश्नच उभे राहत आहेत. “सत्य जेव्हा जाणीवपूर्वक बाहेर येऊ दिलं जात नाही, तेव्हा संशयाचा विळखा अधिक घट्ट होतो,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आता थेट आरपारची लढाई पुकारली आहे. त्यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘घातपाता’च्या चर्चेला हवा दिली आहे.
संयम संपला, आता संघर्षाची वेळ?
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तपासाच्या नावाखाली सुरू असलेल्या दिरंगाईवर सडकून टीका केली आहे. “अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक गोष्टी संशयाच्या फेऱ्यात आहेत. प्रत्येक वेळी तांत्रिक कारणांचं रडगाणं गायलं जातंय, पण सत्य मात्र कोसो दूर आहे. आता आमचा संयम सुटत चालला आहे आणि यापुढे आम्ही शांत बसून राहणार नाही,” असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला आहे.
काय लपवत आहेत तपास यंत्रणा?
एकीकडे विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) डेटा रिकव्हरीसाठी धडपडत असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे हा डेटा जाणीवपूर्वक ‘करप्ट’ केला जातोय की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ठोंबरे-पाटील यांच्या मते, हा केवळ अपघात असता तर आतापर्यंत चित्र स्पष्ट व्हायला हवं होतं. मात्र, २० दिवस उलटूनही हाती शून्य लागल्यानं, “अजून किती दिवस आम्ही धीर धरायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या मनात शंकेची पाल!
ज्या वेगाने या प्रकरणातील तांत्रिक पुरावे (ब्लॅक बॉक्स) खराब झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनातही आता शंकेची पाल चुकचुकत आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केलेला संताप हा केवळ एका पक्षाचा नसून, तो या प्रकरणातील गुढतेमुळे अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाचा प्रतिनिधी मानला जात आहे.
आता रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर तपास यंत्रणांना ‘वेग’ येणार की प्रकरणावर पुन्हा पडदा टाकला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
—
Deepak Kaitke




