अजितदादांच्या अपघातावेळी ‘ती’ फाईल कुठे होती? संजय राऊतांचा संसदेत खळबळजनक दावा; भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा गायब करण्यासाठी घातपात झाला का?
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे पडसाद आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत उमटले आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत, या मृत्यूमागे एक मोठं ‘फाईल’ कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. “भाजपच्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिट्ठा असलेली ती फाईल अजितदादांकडे होती आणि अपघातानंतर ती कुठे गेली?” असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
”७० हजार कोटींच्या आरोपांपासून ‘पवित्र’ होईपर्यंतचा प्रवास”
राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी अजितदादांच्या भाजपसोबतच्या प्रवासावर टोलेबाजी केली. ते म्हणाले, “ज्या अजित पवारांवर भाजपने ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनाच सत्तेत सोबत घेऊन भाजपने ‘वॉशिंग मशीन’मध्ये पवित्र करून घेतलं. पण या मैत्रीत काहीतरी काळं-बेरं नक्कीच होतं.”
१५ जानेवारीचा ‘तो’ इशारा अन् १० दिवसांत मृत्यू!
संजय राऊत यांनी एका महत्त्वाच्या घटनाक्रमाकडे सभागृहाचे लक्ष वेधले:
१५ जानेवारी: अजित पवारांनी जाहीरपणे भाजपला इशारा दिला होता की, सिंचन घोटाळ्यात केवळ माझ्यावर आरोप झाले, पण खरी मलाई भाजपनेच खाल्ली आहे.
अजितदादांचा दावा: “या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे आणि फाईल माझ्याकडे आहे,” असे त्यांनी १५ जानेवारीला ठणकावून सांगितले होते.
१० दिवसांनंतर: या विधानानंतर अवघ्या १० दिवसांत अजितदादांचा रहस्यमय विमान अपघातात मृत्यू झाला.
”ती फाईल अजितदादांच्या सोबतच होती!”
राऊत यांनी सभेत सर्वात मोठा बॉम्ब टाकला की, अजित पवार ही महत्त्वाची फाईल कायम स्वतःजवळ बाळगायचे. “माझ्या माहितीनुसार, ज्या दिवशी ते मुंबईहून बारामतीला निघाले, त्या दिवशीही ती फाईल त्यांच्याकडेच होती. मुंबई सोडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात विमानाचा अपघात झाला आणि दादांचा मृत्यू झाला. मग ती फाईल गेली कुठे? अपघाताच्या ढिगाऱ्यात ती फाईल सापडली का?” असा सवाल राऊत यांनी विचारला.
न्यायमूर्ती लोयांच्या प्रकरणाशी तुलना
अजित पवारांच्या मृत्यूची तुलना करताना संजय राऊत यांनी थेट न्यायमूर्ती लोया यांच्या प्रकरणाची आठवण करून दिली. “हा केवळ तांत्रिक अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका दमदार नेत्याचा अशा प्रकारे शेवट होणे लोकशाहीसाठी घातक आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची तातडीने न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी लावून धरली.
सरकारची कोंडी होणार?
संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारची मोठी अडचण झाली आहे. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरून सुरू झालेला हा वाद आता संसदेच्या पटलावर आल्याने, सरकार यावर काय स्पष्टीकरण देते आणि सीआयडी चौकशीत या ‘फाईल’चा उल्लेख येतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
—
Deepak Kaitke




