टॉप स्टोरी राजकारण

अजितदादांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा’ पर्वाचा उदय; विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम की संघर्षाची नवी ठिणगी?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर सुरू झालेले ‘विलिनीकरण’ नाट्य आता एका नव्या वळणावर आले आहे. “आम्ही आमचे दैवत गमावले आहे, मात्र अशा दुःखाच्या प्रसंगी शरदचंद्र पवार गटाकडून केले जाणारे राजकारण अत्यंत खालच्या थराचे आहे,” अशा जळजळीत शब्दांत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

विलिनीकरणाचा कोणताही विषय अजेंड्यावर नसून, सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमाने उभा राहणार असल्याची घोषणा करत परांजपे यांनी राजकीय वर्तुळातील अफवांना पूर्णविराम दिला आहे.

विमान अपघाताच्या चौकशीवरून सुरू असलेल्या संशयाकल्लोळावर भाष्य करताना परांजपे यांनी थेट रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. “विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे, मात्र ब्लॅकबॉक्स राजकीय आगीत जळाल्याचे विधान करून रोहित पवार संभ्रम पसरवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच खासदार अमोल कोल्हे यांच्या तांत्रिक ज्ञानावर शंका उपस्थित करत, त्यांनी एबी फॉर्मवरून केलेल्या दाव्यांची खिल्ली उडवली. “कोल्हे उत्तम अभिनेते आहेत, पण त्यांना राजकारणातील तांत्रिक बाबी कळत नाहीत. जर दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवणे म्हणजे विलिनीकरण असेल, तर मशाल चिन्हावर लढणारा शरद पवार गट ‘उबाठा’ मध्ये विलीन झाला आहे का?” असा तिखट सवाल त्यांनी विचारला.
अजितदादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाने आता नवी रणनीती आखली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा अजितदादा पवार यांची ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड केली जाणार असून, पक्ष बळकटीकरणाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली जातील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत राहूनच आपले अस्तित्व सिद्ध करेल, असे परांजपे यांनी ठामपणे सांगितले. पडद्यामागून विलिनीकरणाच्या वावड्या उठवून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना यापुढे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *