महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेहमीच जनतेच्या प्रश्नावर बोलतात. त्यांच्या मागे चौकशीचे कोणतेही शुल्काष्टक नाही, कोणत्याही बँकेचे कर्ज घेऊन त्यांनी संस्था उभ्या केलेल्या नाहीत. शुद्ध गांधीवादी मार्गाने जाणारा हा कार्यकर्ता आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे आमदार होण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठ गांधीवादी नेते गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेचे डॉ. अभय बंग यांचे पिताजी ठाकूरदास बंग यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात पदयात्रा काढली. त्यामागे त्यांची ग्रामसुधारणेसाठी फार मोठी तळमळ होती. अनेक विधायक कामात त्यांचा पुढाकार असतो हे आम्ही स्वतः बघितलेले आहे.
अशा या निष्कलंक असणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षाला बोलताना आपण कोणती भाषा वापरतो, कोणाबद्दल काय बोलतो आणि त्याचे कोणते परिणाम होतील, यामुळे आपल्या विरोधकांना आयतेच कसे कोलीत मिळेल किंवा मिळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. परवा बुलढाणा येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्य आणि पराक्रमाचा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्यांच्या समकक्ष काम केले आहे असा दाखला दिला. त्यानंतर टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे असे म्हणून नको ती उठाठव करण्याची खरच काय गरज होती हेच आम्हाला समजत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक होते, त्यांनी मोगलांच्या सुलतानी शाह्यांना टक्कर देऊन आपले स्वराज्य स्थापन केले. ते एवढे मजबूत होते की, त्यानंतर औरंगजेबाला आधी दिल्ली आणि नंतर आग्रा सोडून मराठ्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात यावे लागले. शेवटी औरंगजेबाचे प्राण अल्लाहने या महाराष्ट्रातूनच उचलून नेले आणि त्यानंतरच्या अवघ्या पंधरा वर्षांच्या आत मोगल साम्राज्य जे कोसळले ते पुन्हा उभे राहिलेच नाही. त्यानंतरचे त्यांचेच वंशज मराठ्यांच्या वर्चस्वाखाली होते हेही इतिहासात नमूद आहे.
अशा स्वराज्य स्थापना करणाऱ्या भारताच्या इतिहासातील विश्ववंदनीय राजांची तुलना वारसाहक्काने स्थापन केलेल्या गादीवर बसणाऱ्या टिपू सुलतान सोबत करावी हे कोणालाही पटणार नाही. टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्ध लढाई केली पण त्याच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सर्व धर्मांचा आदर करणाऱ्या विचारांचा पायंडा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मंदिरांचा उद्धार केला तसेच मुस्लिमांसाठी मशिदींचा उद्धार करून त्या उभारण्यात आम्ही मदतही केली. जर कधी युद्धकाळात हाती कुराण सापडले तर ते आपल्या सैन्यातील मुसलमान अधिकाऱ्याला किंवा शिपायाला आदराने देत असत, हाही इतिहास सर्वश्रुत आहे.
तेव्हा शिवाजी महाराजांच्या पासंगालाही पुरणार नाही अशा टिपू सुलतानाला शिवाजी महाराजांच्या समकक्ष दाखवून सर्वनाशाची अवदसा हर्षवर्धन यांना कशी काय आठवली, हाच मोठा प्रश्न आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे हे शब्द उच्चारले. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची अशी तुलना केल्यामुळे विनाकारण वादाला तोंड फुटलेले आहे. भारतीय जनता पक्षाला मुस्लिम मते नकोतच असे त्यांचे म्हणणे आहे, इकडे काँग्रेस पक्षाला फक्त मुस्लिम मतेच हवी आहेत काय? काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभावाला मानतो पण असे करताना एखादे विधान कसे स्वतःच्याच अंगलट येऊ शकते याचा नमुना म्हणजे सपकाळ साहेबांचे हे विधान आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यासमोर असलेल्या कितीतरी प्रश्नांवर बोलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तर आत्महत्या करायला लावणारच आहेत. महागाई दिवसेंदिवस डोंगरासारखी वाढत आहे, बेकारी बेकारीतून निघणाऱ्या पावासारखी फुगत आहे. तेव्हा आजचे हे प्रश्न डोळ्यासमोर आ वासून उभे असताना त्यावर राहुल गांधी यांच्यासारखे घणाघाती हल्ले त्यांना करता येतात आणि तेच विरोधी पक्षाचे काम आहे, ते सोडून नको त्या वादात स्वतःला गुंतवून घेण्याचे कारणच काय?
भारतीय जनता पक्ष विरोधात असताना अगदी नेमक्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलने केली आणि आज ते सत्तेवर आहेत. त्यांची सत्तेवरील पकड आजच्या घडीला इतकी पक्की आहे की त्यांना विरोध करून सत्ता मिळवणे सोपे नाही. त्यांचे बहुमत असूनही चंद्रपूरमध्ये चंद्र उगवलाच नाही उलट तो मावळलाच ना? काँग्रेस पक्षातील लांबच लचक भांडणे सोडवणे हाच त्यांच्या समोरील मोठा प्रश्न आहे. गटागटातील विभागणी सोडवण्याऐवजी टिपू सुलतान यांना थोर बनवणे हे नको ते कर्म आहे. त्याचे मर्म ओळखून आता तरी त्यांनी आपल्या स्वभावानुरूप सभ्य वाणीत बोलावे, एवढेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मातृस्थान जिजाऊंचे बुलढाणा रहिवाशांबरोबर महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचे म्हणणे आहे.
जय जिजाऊ! जय शिवराय!!


