बदलापूर,दि.१९,प्रतिनिधी:कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत आहे.यामध्ये १५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी विकास कामांच्या नावाखाली हडप केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू करून कागदपत्रांची मागणी केली आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेची बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या पत्राची चर्चा रंगली होती. भाजपने या पत्राला समर्थन दर्शवले आहे. शिवसेना शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी या चौकशी पत्रामागचा हेतू काय, असा मुद्दा उपस्थित केला,त्यावर उत्तर देताना भाजपचे गटनेते शरद तेली यांनी नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक असला पाहिजे असे स्पष्ट केले. भविष्यात आमदार झाले तर उत्तर देता आले पाहिजे,असा टोला लगावून भाजप आघाडीने पत्राचे समर्थन केले आहे.
पत्रातील चौकशीचे विषय
उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेला विकास कामांची माहिती मागितली आहे.वर्ष-२०१० ते वर्ष २०२५ पर्यंत झालेल्या विकासकांची माहिती, या कालावधीत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून आलेला निधी, सर्व झालेल्या सभांची माहिती, त्याचे इतिवृत्तांत, यामधील कंत्राटदारांची यादी, ज्या प्रभागामध्ये विकास कामे करण्यात आली त्या प्रभागातील नगरसेवकांची यादी, विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेली बिले, लेखाधिकारी, लेखापरीक्षक, कामांच्या मोजमाप पुस्तकातील नोंदी, इंजिनीयर नांवे अशी माहिती त्या पत्रात मागवली आहे.
दरम्यान,हा कोंडीत पकडण्याचा राजकीय डाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे.




