कोरा सातबारा परत मिळावा या साठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाळ गंगा धरण प्रकल्पग्रस्तांना दिली भेट
बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. “कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपविभागीय (प्रांत) कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत बेमुदत उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले आहे . प्रशासनाला यापूर्वी सुद्धा निवेदन देण्यात आले होते. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.या उपोषणाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकळं, महासचिव संघटक कॉग्रेस नंदा म्हात्रे, श्रुती म्हात्रे, महिला जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस राणी अग्रवाल, यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिबा दर्शवला
बाळगंगा धरण प्रकल्पासाठी सन 2010 पासून जमिनी संपादित करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे पेण तालुक्यातील नऊ गावे व तेरा आदिवासी वाड्यांतील सुमारे 3,800 हून अधिक कुटुंबे बाधित झाली आहेत. एकूण 1,240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. ‘न्याय्य नुकसानभरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013’ मधील कलम 101 नुसार, पाच वर्षांत वापरात न आणलेली संपादित जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे. बाळगंगा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला 16 वर्षे पूर्ण झाली असून अनेक जमिनींचे सातबारा उतारे कोरे झाले आहेत. त्यामुळे संबंधित जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.





