जागा पालिकेची, त्रास जनतेला अन मलिदा खातोय कोण? रस्ते खोदाईच्या नावाखाली मुंबईत हजारो कोटींचा ‘टाटा’ घोटाळा?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर आणि मुंबईकरांच्या हक्काच्या रस्त्यांवर खाजगी कंपन्यांनी डल्ला मारला असून, यामागे पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा स्फोटक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “८ हजार कोटी रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते बनवायचे आणि अवघ्या काही महिन्यांत ते खाजगी कंपन्यांच्या घशात घालायचे, हा मलिदा खाण्याचा कोणता प्रकार आहे?” असा जळजळीत सवाल करत देशपांडे यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
मुंबईत ‘बेस्ट’ची वीज सेवा सक्षम असताना टाटा पॉवरला रस्ते खोदण्याची परवानगी का दिली गेली, इथूनच संशयाची सुई फिरते. धक्कादायक बाब म्हणजे, परवानगी इलेक्ट्रिकल केबलची घेतली जाते आणि जमिनीखाली छुप्या पद्धतीने ‘टाटा ऑप्टिकल फायबर’चे जाळे विणले जात आहे. एका कामाच्या बदल्यात चार वेगवेगळ्या सेवांचे पैसे खाजगी कंपन्या कमवत असताना, महापालिकेला त्यातून उत्पन्न का मिळत नाही? “जागा पालिकेची वापरायची आणि नफा खाजगी कंपन्यांनी कमवायचा, यात महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत?” असा थेट हल्ला देशपांडे यांनी चढवला आहे.
या सर्व गैरप्रकारामुळे मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकले असून, नवीन रस्त्यांची वाट लागली आहे. “महापालिकेच्या हाती ‘ठण ठण गोपाळ’ असताना कंपन्यांना रस्ते आंदण का दिले जात आहेत?” असा सवाल करत, ज्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांना मोकळे रान करून दिले, त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी मनसेने केली आहे. खाजगी कंपन्यांकडून कर वसुली करण्याऐवजी सर्वसामान्य मुंबईकरांच्या पाणीपट्टीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. रस्ते खोदाईच्या या ‘मलिदा गँग’चा पर्दाफाश झाल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.



