नागपूर

नागपूर विभागात1382 रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत

मागील वर्षी केवळ 16 दात्यांकडून अवयवदान

सुजाता बंडावार:झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूर अंतर्गत 1382 रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असून मागील वर्षी केवळ 16 दात्यांकडून अवयवदान झाले आहे.यावर्षी केवळ दोन दात्यांनी अवयव दान केले आहे. वाढते अपघात आणि ब्रेन डेड होऊन होणाऱ्या मृत्यूच्या संख्येच्या तुलनेत अवयवदानाचे प्रमाण हे केवळ 0.6 ते 0.7%च आहे. ही आकडेवारी अवयवदानाबाबत असलेली कमालीची उदासीनता दर्शविते हे मात्र निश्चित.
ब्रेन डेड झालेल्या व्यक्ती शरीरातील विविध आठ अवयव दान करून आठ व्यक्तींचे आयुष्य वाचवू शकतात. अशाप्रकारे मृत्यूनंतरही तो दुसऱ्यांच्या आयुष्यात अवयवरूपात जिवंत राहू शकतो. पण अजूनही समाज पुनर्जन्म ,सद्गती, मोक्ष प्राप्ती आणि रूढी, परंपरेत अडकलेला असल्याने समाजात अजूनही देहदान व अवयवदानाविषयी एक टक्काच जनजागृती आहे. महाराष्ट्रात चार झेडटीसीसी आहेत त्यापैकी झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर नागपूर ही संस्था विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी काम करते. अवयव दाते आणि गरजूंची नोंदणी आणि गरजूंपर्यंत दात्यांकडून प्राप्त अवयव पोहोचवून ट्रान्सप्लांटेशन प्रक्रिया पूर्ण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभाविते. झेडटीसीसी नागपूर अंतर्गत 1150 रुग्ण मूत्रपिंड आणि 232 यकृतच्या प्रतीक्षेत असून एकेक दिवस मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत. असे असताना मात्र 2013 पासून सुरू झालेल्या अवयवदान मोहिमेत आतापर्यंत केवळ 187 दात्यांकडून अवयवदान झाले आहे.
अवयव दानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. मात्र भारतात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत आहे. देशात दरवर्षी जवळपास 1.5 लाख मूत्रपिंडांची गरज असताना केवळ 5000 मूत्रपिंड उपलब्ध होतात. 50,000 हृदयांची गरज असताना 10 ते 15 हृदय तर पन्नास हजार यकृतांची गरज असताना केवळ 700 यकृत मिळतात. परिणामी एका एका अवयवासाठी वर्षानुवर्ष वाट पाहत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

अवयवांच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण
मुत्रपिंडासाठी 1150 रुग्ण प्रतीक्षेत
यकृतसाठी 232 रुग्ण प्रतीक्षेत

2013 पासून ब्रेन डेड दात्यांकडून करण्यात आलेले अवयवदान
2013 _ 01
2014 _ 03
2015 _ 04
2016 _ 06
2017 _. 14
2018 _. 18
2019 _. 18
2020_. 03
2021_. 18
2022_. 10
2023_. 35
2024_. 39
2025_. 16
2013 पासून अवयवदानाची मोहीम सुरू झाल्यानंतर 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये झालेल्या अवयवादाच्या तुलनेत मागील वर्षी झालेले अवयवदान हे निम्म्यापेक्षाही कमी आहे. अवयव दानाबाबत असलेली उदासीनता कमी करण्यासाठी शासन आणि आरोग्य यंत्रणेने ठोस व कठोर पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

डॉ.संजय कोलते अध्यक्ष झेडटीसीसी नागपूर
अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत आणि ब्रेनडेड ने मृत्यू होणाऱ्या संख्येच्या तुलनेत केवळ 0.6 ते 0.7%च अवयवदानाचे प्रमाण असल्याने अवयवदानाबाबत अजूनही एक टक्का जनजागृती आहे. सरकारने अवयवदान वाढवण्यासाठी कठोर धोरण, ब्रेनडेड नोंदणी, रुग्णालयांची जबाबदारी निश्चित करणे आणि व्यापक जनजागृती करणे हाच आता एकमेव मार्ग आहे. अन्यथा ही आकडेवारी अधिक भयावह होणार यात शंका नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *