पुणे मार्केट यार्डातील लिंबू विक्रीचा पेच सुटणार; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी हालचाली
मुंबई, विशेष प्रतिनिधी:पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू विक्रीवरून सुरू असलेल्या ‘फळ विभाग’ विरुद्ध ‘भाजीपाला विभाग’ या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली असून, शेतकरी आणि आडतदार अशा दोघांच्याही हिताचे रक्षण व्हावे, यासाठी पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच निर्णायक बैठक बोलावली जाणार आहे.
काय आहे नेमका वाद?
पुणे मार्केट यार्डच्या नियमानुसार लिंबू विक्री ही फळ विभागात होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही विक्री भाजीपाला विभागात ‘डमी आडत्यांमार्फत’ केली जात असल्याचा आरोप फळ विभागातील व्यापाऱ्यांनी केला आहे. यामुळे अधिकृत लिंबू आडतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, बाजार समितीने आपले धोरण प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च
या संदर्भात विधानभवनात पार पडलेल्या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले की, लिंबू विक्रीचे नियंत्रण करताना केवळ व्यापाऱ्यांचाच नाही, तर मूळ शेतकऱ्याचाही विचार होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटनांनी भाजीपाला बाजारात लिंबू विक्री करण्याची मागणी केली असल्याने हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत व्यापारी संघटना आणि शेतकरी प्रतिनिधी या दोघांनाही पाचारण करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पणन विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे आणि बाजार समितीचे सभापती व प्रतिनिधी उपस्थित होते. या समन्वयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लिंबू विक्रीच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
—
Deepak Kaitke




