महाराष्ट्र

पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचा ‘रुद्र’ अवतार; बांग्लादेशींच्या शिकारीसाठी टाकलेल्या जाळ्यात नेमकं कोण अडकलं?

विशेष प्रतिनिधी:रात्रीचे १२ वाजले होते… पुण्याची बुधवार पेठ नेहमीप्रमाणे आपल्याच धुंदीत असताना अचानक शेकडो पोलिसांच्या बुटांचा आवाज घुमला आणि संपूर्ण परिसर जणू स्तब्ध झाला. स्थानिक पोलिसांपासून गुन्हे शाखेच्या विविध युनिट्सपर्यंत तब्बल १५० जवानांच्या फौजेने पेठेच्या प्रत्येक गल्लीला वेढा घातला. हे साधेसुधे गस्त घालणे नव्हते, तर ते होते एक मोठे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’. फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याने एका बांग्लादेशी तरुणीची माहिती लपवून पैसे घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच, पोलीस दलाने आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही धडक कारवाई सुरू केली होती.
प्रत्येक गल्लीबाहेर कडेकोट नाकाबंदी, ५० हून अधिक संशयित कुंटणखान्यांची झडती आणि महिला पोलिसांचा कडक पहारा… हे चित्र पाहून पेठेत एकच पळापळ सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच ‘डिस्को बिल्डिंग’ मधून १० बांग्लादेशींना बेड्या ठोकल्या गेल्याने, आजही काही मोठे ‘मासे’ गळाला लागतील अशी पोलिसांना खात्री होती. मध्यरात्रीपासून पहाटे ३ वाजेपर्यंत पोलिसांनी पेठेतील कानाकोपरा पिंजून काढला. पण, या मोहिमेत पोलिसांना जे समोर दिसले, ते खरोखरच अनपेक्षित होते.
ज्या बांग्लादेशी घुसखोरांच्या आणि तस्करांच्या शोधासाठी हा सगळा फौजफाटा उतरला होता, ते तर पोलिसांच्या हाती लागले नाहीत; मात्र या कारवाईत एक वेगळंच ‘सावज’ पोलिसांच्या जाळ्यात अडकलं. वेश्यावस्तीच्या काळोखात गुपचूप शिरलेले अनेक ‘हौशे-नवशे’ तरुण पोलिसांच्या कचाट्यात सापडले. ग्राहक म्हणून आलेल्या या तरुणांची पोलिसांनी भररस्त्यात चांगलीच ‘शाळा’ घेतली. त्यांना रांगेत बसवून त्यांचे नाव, पत्ता आणि घराची कुंडली तपासण्यात आली. ज्या उद्देशाने पोलीस आले होते, त्या ऐवजी भलत्याच कामासाठी आलेल्या या तरुणांची भंबेरी उडालेली पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या प्रहारामुळे बुधवार पेठ हादरली असली, तरी या कारवाईची चर्चा आता संपूर्ण पुण्यात रंगली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *