बदलापूर, दि. ५,प्रतिनिधी:बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकाचे एक पद रिक्त झाले होते. यापूर्वी भाजपकडून शागोफ गोरे व तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले होते. मात्र वादंग निर्माण झाल्यानंतर तुषार आपटे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने एक पद रिक्त झाले होते.
प्रविण राऊत हे यापूर्वी शिवसेनेकडून नगरसेवक पदाचे उमेदवार होते. निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी ते इच्छुक होते. मात्र या पदासाठी शिवसेनेकडून दिलीप बैकर व हेमंत चतुरे यांची निवड झाल्याने प्रविण राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान,काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र निष्ठावंतांचा विचार न केल्याबद्दल त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रविण राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचा झेंडा हाती घेतला. बुधवारी दि. ४ रोजी भाजप-राष्ट्रवादी आघाडीकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले आहे.
विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, उपमुख्याधिकारी केतन गुजर, तसेच भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.प्रविण राऊत यांना ठाणे जिल्ह्यातील बहुजन युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाते. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. भाजपचे गटनेते शरद तेली यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.




