मुंबई : एकांकिका स्पर्धांमध्येबोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे एक वेगळेच स्थान आहे. ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ तर्फे आयोजित यंदाच्या या स्पर्धेची अंतिम फेरीची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. सुप्रिया प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या यंदाच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत अंतिम फेरी होणार आहे. विविध बोलीभाषांतील एकांकिका यावेळी सादर होणार आहेत.
सुप्रिया प्रॉडक्शन आयोजित, ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. यावर्षी ‘सपान’ (डॉक्टर्स थिएटर ग्रुप -माणदेशी), डिझाइन’ (डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय – घाटी), ‘त्यात काय!’ (एकदम कडक नाट्यसंस्था – घाटी), ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ (सृजन द क्रीएशन – मालवणी), ‘पाकळ्या’ (नक्षत्र कलामंच -खान्देशी), ‘सत्य’ (नाट्यारंभ एन. के. टी.टी. -मालवणी) आणि ‘पाकिस्तानचं यान’ (नाट्यांकुर – घाटी) या एकांकिकांमध्ये आता अंतिम फेरीत जबरदस्त चुरस असेल. प्राथमिक फेरीच्या एकांकिकांमधून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक होते. नागपूर मुंबईसह राज्यभरातील नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.




