मुंबई

भाजपमध्ये ‘नातेवाईक’ भारी पडणार की ‘निष्ठा’? मनपा स्वीकृत सदस्य निवडीत नेत्यांच्या आप्तेष्टांचा गेम होणार?

विशेष प्रतिनिधी:मुंबई: महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपसमोर स्वीकृत सदस्य निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पदासाठी पक्षाकडे इच्छुकांच्या अर्जांचा डोंगर साचला असून, खरी लढाई ही नेत्यांच्या ‘नातेवाईकां’मध्ये आणि पक्षाच्या ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. घराणेशाहीला मूठमाती देण्याचा नारा देणारा पक्ष आता स्वतःच्या घरात काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मंत्री, खासदार आणि आमदारांच्या पुतण्या, मुला किंवा इतर जवळच्या नातेवाईकांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतरंज्या उचलणाऱ्या आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठी अस्वस्थता आहे. ही नाराजी ओळखून पक्षश्रेष्ठींनी आता ‘एक व्यक्ती, एक पद’ आणि ‘घराणेशाहीला लगाम’ या सूत्राची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत.

नेत्यांच्या शिफारशीपेक्षा कार्यकर्त्याची ‘निष्ठा’ हाच निवडीचा मुख्य निकष असावा, असा दबाव तळागाळातून वाढत आहे. जर नातेवाईकांनाच पुन्हा संधी दिली गेली, तर सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे काय? असा रोकठोक सवाल आता भाजपच्या गोटात विचारला जात आहे. त्यामुळे, मोठ्या नेत्यांच्या घराण्यातील ‘नव्या वारसांना’ यावेळी मनपाच्या उंबरठ्यावरच रोखले जाण्याची शक्यता असून, निष्ठावान कार्यकर्त्यांचे नशीब फळफळण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *