मालेगावच्या वादात आता ‘नोटां’चा तडका! टिपू सुलतान आणि नमाज प्रकरणाच्या धुराड्यातून बाहेर आलं ‘फेक करन्सी’चं काळं जाळं; मुख्य सूत्रधार अखेर जाळ्यात!
विशेष प्रतिनिधी:कधी उपमहापौर कार्यालयातील टिपू सुलतानचा फोटो, तर कधी महापालिकेत झालेले नमाज पठण… मालेगाव गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असतानाच आता एका ‘नोटा’ प्रकरणाने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. शहरातील एका नामांकित बँकेत चक्क बनावट नोटांचा भरणा करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, पोलिसांनी या रॅकेटचा छडा लावत थेट छत्रपती संभाजीनगरमधून मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या थराराची सुरुवात झाली ती २३ जानेवारी रोजी. एका फायनान्स कंपनीचा एजंट जेव्हा मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील एचडीएफसी बँकेत रोख रक्कम भरण्यासाठी पोहोचला, तेव्हा सर्व काही सामान्य वाटत होतं. मात्र, ८९ हजारांच्या त्या रकमेत ५०० रुपयांच्या अशा १०० नोटा होत्या ज्यांनी बँकेच्या मॅनेजरना विचार करायला भाग पाडलं. ५० हजार रुपयांच्या या नोटा बनावट असल्याचं समोर येताच बँकेने पोलिसांत धाव घेतली आणि एका मोठ्या रॅकेटचा धागा पोलिसांच्या हाती लागला.
अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पथक तैनात केले. पोलिसांनी संशयाची सुई एकाकडून दुसऱ्याकडे वळवत तपास सुरू केला. एजंटपासून सुरू झालेला हा प्रवास अजय राठोड, करण राठोड आणि पुढे छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल यादव, रेहान खान यांच्यापर्यंत पोहोचला. पोलिसांनी जेव्हा या टोळीची कसून चौकशी केली, तेव्हा या काळ्या धंद्याचा ‘मास्टरमाइंड’ समोर आला – तो म्हणजे संतोष उत्तमराव केळसकर.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष केळसकर हा छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘विनायक ग्राफिक्स’ नावाचे दुकान चालवत होता. या दुकानाच्या आड तो बनावट नोटांचे कारखाने चालवत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३८५ बनावट नोटांसह प्रिंटर, हाय-क्वालिटी पेपर, स्क्रीन प्रिंट आणि कटिंगचे साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मालेगावमध्ये बनावट नोटा उघडकीस येण्याची ही तिसरी वेळ असल्याने खळबळ उडाली आहे. राजकारणावरून पेटलेल्या मालेगावमध्ये आता हे गुन्हेगारी कनेक्शन समोर आल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.




