मुरबाड,दि.८,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. मालवाहू आयशर टेम्पो पुलावरून घसरून थेट काळू नदीत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवर बांधलेल्या पुलावर संरक्षक कठडे नसल्याने पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. मोरोशी हुन न्याहाडी दिशेने जात असलेला मालवाहू आयशर टेम्पो पुलावरून थेट काळू नदीत पडला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.कल्याण–माळशेज महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अहिल्यानगर, जुन्नर, आळेफाटा, मंचर आदी भागातून येणारी अवजड वाहतूक माळशेज मार्गे मोरोशी–न्याहाडी रस्त्याने शहापूरकडे व समृद्धी महामार्गाकडे वळवण्यात येत आहे. परिणामी न्याहाडी गावातील काळू नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे.
हा पूल अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून आजतागायत पुलाला संरक्षक कठडे बसवण्यात आलेले नाहीत. मोरोशी बाजूकडून येताना उतार असल्याने वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नाही. याच कारणामुळे आयशर टेम्पोचा तोल जाऊन तो थेट पुलाखाली नदीत पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.विशेष म्हणजे मागील वर्षी याच पुलावरून एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
न्याहाडी, मोरोशी परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा संरक्षक कठडे बसवण्याची मागणी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान,न्याहाडी गावातील काळू नदीवरील पूल हा सध्या जीवघेणा ठरत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार अपघात होत असून प्रशासनाने तातडीने संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी केली जात आहे.




