शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा जागतिक बहुमान; युनेस्कोचे मानांकन स्वीकारण्यासाठी आशिष शेलार फ्रान्सच्या भूमीवर!
विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या दुर्गवैभवावर आता जगाची अधिकृत मोहोर उमटणार आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ अंतर्गत महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना मिळालेले ‘जागतिक वारसा’ प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. पॅरिसमध्ये होणाऱ्या या सोहळ्यामुळे शिवरायांचा लष्करी वारसा आणि मराठा साम्राज्याची शौर्यगाथा आता जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरली जाणार आहे.
११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोने शिवनेरी, रायगड, राजगड आणि प्रतापगड यांसह एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले होते. या ऐतिहासिक क्षणासाठी ॲड. आशिष शेलार यांनी गेल्या दीड वर्षांपासून युनेस्कोच्या मुख्यालयात तांत्रिक आणि धोरणात्मक युक्तिवाद करून किल्ल्यांचे महत्त्व जगासमोर मांडले होते. आता या प्रदीर्घ पाठपुराव्याचे फळ म्हणून प्रत्यक्ष मानांकन पत्र स्वीकारताना संपूर्ण महाराष्ट्र या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होणार आहे.
पॅरिसमध्ये महामानवाचा जागर आणि संविधानाचा सन्मान
या दौऱ्याचे एक महत्त्वाचे केंद्र युनेस्को मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा असेल. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने हा पुतळा युनेस्कोला भेट दिला असून, ॲड. आशिष शेलार या महामानवाच्या स्मृतींना पॅरिसमध्ये अभिवादन करणार आहेत. सामाजिक न्याय आणि समतेचे विचार जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
पंढरपूरची वारी आणि दहीहंडीही जागतिक स्तरावर झळकणार?
गड-किल्ल्यांनंतर आता महाराष्ट्राची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मंत्री शेलार युनेस्कोच्या तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. पंढरपूरची वारी, सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या अमूर्त वारशांना जागतिक स्तरावर स्थान मिळवण्यासाठी या दौऱ्यात विशेष प्रयत्न केले जातील. याशिवाय, पॅरिसमधील नामांकित संग्रहालयांच्या धर्तीवर वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र वस्तू संग्रहालया’चे नियोजन अधिक समृद्ध करण्यासाठी या शिष्टमंडळाकडून पाहणी व अभ्यास केला जाणार आहे.
—
Deepak Kaitke




