आलेख

शो मस्ट गो ऑन

सुनेत्राताईंचं खरंच काय चुकलं? जीवनातल्या ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वानुसार त्यांनी नवऱ्याचा पक्ष आणि त्याच्या पदाची जबाबदारी स्वीकारली तर घराणेशाही मानणाऱ्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचं कारणंच नाही. आणि, घराणेशाही विरोधकांनाही यावर फारसा आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण, ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ पवार’ वगैरे डायलॉगनुसार सुनेत्राताईसुद्धा जन्मापासूनच राजकारण शिकत आल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. अर्थात, आधी त्या पाटील होत्या आणि आता पवार आहेत, हाच काय तो फरक!

त्यामुळे, अजितदादांचं धक्कादायकरीत्या जाणं हे सर्वांनाच हुरहूर लावणारं असलं तरी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवारांना शुभेच्छा देऊन त्यांची पुढची वाटचाल समाजहिताची कशी राहील, याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण, सध्या त्यांचेच कुटुंबीय हे मानत नाहीत, असेच दिसून येत आहे. असो, तो पवारांचा घरगुती प्रश्न आहे, त्यावर आपण कशाला चर्चा करायची? पण, राजकारण, समाजकारण हे सार्वजनिक जीवनाचा भाग असल्याने त्यावर बोलण्याचा हक्क तुम्हा-आम्हा सर्वांनाच लोकशाहीनं दिलाय म्हणूनच, सध्या सोशल मीडियावर जी बडबड सुरू आहे आणि ती कायम राहणार!

तसं पाहिलं तर, शरद पवार महाराष्ट्रातलं अत्यंत मोठं राजकीय नेतृत्व असलं तरी त्यांना आजवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या तराजूतच तोललं गेलंय. त्यांनी आजवर अनेकदा शब्द, वचन, भाकरी फिरवण्याचीच कामगिरी केली आहे, हे सोदाहरण सिद्ध केलं गेलंय. त्यांनीही अनेकदा आपल्याच भूमिका सातत्याने बदलल्यात. अगदी दुसरे पक्ष फोडताना आणि स्वतःचा पक्ष फुटतानाही, त्यांनी स्वतःची ही इमेज कायम ठेवली आहे. अन्यथा, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्याच कुटुंबातील दरी समोर आणून गैरसमज वाढवण्याचं कर्म त्यांनी सहेतू केलं नसतं. जसं अजितदादांचं निधन हे घातपात नसून अपघात असल्याचं ठामपणे सांगून (कोणतीही चौकशी सुरूही झाली नसताना) पवारांनी एक वेगळीच भूमिका घेतली, तशीच सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबतही घेतली. त्यानंतर, राजकीय पोपटही त्यानुसार पोपटपंची करू लागले, हे आपण पाहतच आहोत. थोडक्यात काय, तर स्वतःच्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढवण्यावर त्यांनी भर दिला. राजकारणात जेव्हा तुम्ही लोकांना समजवू शकत नाही तेव्हा संभ्रमात टाका, असं म्हटले जाते. इंग्रजीतल्या if u cannot convince then confuse them, या उक्तीनुसारच शरद पवार वयाच्या ८६ व्या वर्षीही वागत आहेत, असंच म्हणावं लागेल.

स्वप्नील सावरकर
savarkarswapnil@gmail.com

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *