संत रोहिदासांच्या विचारातूनच सामाजिक समता शक्य? चर्मकार समाजाचे प्रश्न सुटणार? मुंबईतील ६५० व्या जयंती सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी | मुंबई:संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे कार्य वारकरी संप्रदायाला आणि समतेच्या विचाराला पुढे नेणारे आहे, असे मत संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे यांनी व्यक्त केले. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात रविवारी, १ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती सोहळ्याचा शुभारंभ झाला. या प्रसंगी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी सांगितले की, संत रोहिदासांनी भक्तीसोबतच संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी वठलेल्या चिंचेच्या झाडाला नवजीवन दिले होते, त्याची आठवण म्हणून प्रत्येक समाजबांधवाने जयंतीनिमित्त एक चिंचेचे रोप लावावे, असे आवाहन त्यांनी केले. पुढच्या वर्षी या सोहळ्यात सर्व संतांच्या वंशजांना सहभागी करून घेण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोहळ्याला हजेरी लावली. चर्मकार समाजाने दिलेल्या मागण्यांच्या निवेदनावर येत्या वर्षभरात सकारात्मक निर्णय घेऊन त्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन लोढा यांनी यावेळी दिले.
आक्रमकांविरुद्ध संतांचा संघर्ष
रा.स्व. संघाचे मुंबई महानगर सह संघचालक प्रा. डॉ. विष्णूजी वझे यांनी सांगितले की, भारतात आक्रमकांनी मूळ संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतांच्या भक्ती संप्रदायामुळे ती जिवंत राहिली. आपल्या मूळ परंपरेत अस्पृश्यता नव्हती, ती नंतरच्या काळात घुसली आणि त्याविरुद्ध संतांनी मोठा लढा दिला, असे त्यांनी नमूद केले.
विविध सांस्कृतिक उपक्रम
या सोहळ्यात संत रोहिदास यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रोशनी मालांडकर यांनी सावरकर लिखित संत रोहिदास गीत सादर केले, तर शाहिर यशवंत जाधव आणि दत्ता राम म्हात्रे यांनी पोवाडे सादर केले. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार बाबुराव माने यांच्यासह समाजातील विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुरुदेव कांबळे यांनी मानले.




