अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा हॉर-कॉमेडी स्त्री 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील जादू काही कमी व्हायचं नाव घेत नाहीय. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 43 दिवसांनंतर ही स्त्री 2 कमाईमध्ये नवे विक्रम रचत आहे. स्त्री 2 चित्रपट हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही, तर या चित्रपटाने जगभरात भरपूर कमाई केली आहे. या हॉरर कॉमेडीची क्रेझ कमी होत नसून रिलीजच्या सहाव्या आठवड्यातही चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहात पोहोचत आहेत.
‘स्त्री 2’ ची रिलीजच्या 43 व्या दिवशी कमाई किती?
‘स्त्री 2’ चित्रपट रिलीज होऊन 43 दिवस झाले आहेत, पण बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ ची गाडी थांबण्याचा नाव घेत नाहीय. हा चित्रपट केवळ वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला नाही तर, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. सहावा आठवडा असूनही चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे. ‘देवरा’ किंवा ‘जिगरा’सारखा मोठा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईपर्यंत या चित्रपटाची क्रेझ कायम राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तरण आदर्शने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘स्त्री 2’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 307.80 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 145.80 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 72.83 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 37.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात 25.72 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. चित्रपटाने सहाव्या शुक्रवारी 5.20 कोटी, सहाव्या शनिवारी 3.80 कोटी, सहाव्या रविवारी 5.32 कोटी, सहाव्या सोमवारी 1.50 कोटी, सहाव्या मंगळवारी 1.35 कोटी आणि सहाव्या बुधवारी 1.30 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटाचे एकूण 42 दिवसांचे कलेक्शन 608.37 कोटी रुपये झाले.
भारतात 600 हून अधिक कोटींची कमाई
आता चित्रपटाच्या कमाईचे सुरुवाती आकडे स्त्री 2 च्या रिलीजच्या 43 व्या दिवशी म्हणजेच सहाव्या गुरुवारी आले आहेत. Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘स्त्री 2’ चित्रपटाने रिलीजनंतर सहाव्या गुरुवारी म्हणजेच रिलीजच्या 43 व्या दिवशी 1.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय ‘स्त्री 2’ चित्रपटाची 42 दिवसांची एकूण कमाई आता 609.42 कोटी रुपये झाली आहे.
‘स्त्री 2’ ने 43 व्या दिवशीही रचला इतिहास
‘स्त्री 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून अनेक विक्रम केले आहेत. रिलीजच्या सहाव्या गुरुवारी या चित्रपटाने इतिहासही रचला. खरं तर, या चित्रपटाने 43 व्या दिवशीही एक कोटींहून अधिकची कमाई केली आहे आणि यासोबतच सलग 43 दिवस कोटींचा व्यवसाय करणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे.