सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सिरीज आणि ॲक्शन चित्रपटांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. या महिन्याचा शेवटचा आठवडा ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज पाहण्यासाठी पॉवरपॅक ठरणार आहे. या आठवड्यात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसह जिओ सिनेमा अशा सर्वच ठिकाणी अनेक नव्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. काही थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज रिलीज सध्या ट्रेंडिंग असून ॲक्शन चित्रपट ही सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
ताजा खबर सीझन 2
या आठवड्यात भुवन बामची बहुप्रतिक्षित वेब सिरीज ताजा खबर सीझन 2 Disney+ Hotstar वर 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ताजा खबरचा दुसरा सीझन वसंत गावडे उर्फ वास्यावर केंद्रित आहे, जो आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या शक्तींचा वापर करतो. मात्र, कहाणीमध्ये खरा ट्विस्ट तेव्हा येईल, जेव्हा युसूफ अख्तर नावाच्या खलनायकाची एन्ट्री होईल. या सिरीजमध्ये भुवन बामसह जावेद जाफरी, श्रिया पिळगावकर आणि महेश मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
लव्ह, सितारा
लव्ह, सितारा हा रोमँटिक चित्रपट एका यशस्वी इंटिरियर डिझायनरची कहाणी आहे, जो लग्नाशी संबंधित सामाजिक अपेक्षांना सामोरे जाताना नातं टिकवण्यासाठी गावी परत येतो. शोभिता धुलिपाला आणि राजीव सिद्धार्थ स्टारर हा चित्रपट आधुनिक लव्हस्टोरी आणि नातेसंबंध सांभाळण्यात येणाऱ्या अडचणींवर आधारित आहे. लव्ह, सितारा चित्रपट 27 सप्टेंबरला Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.
हनीमून फोटोग्राफर
मिस्ट्री क्राइम थ्रिलर हनीमून फोटोग्राफर वेब सिरीज 27 सप्टेंबर जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका फोटोग्राफरभोवती फिरते, जी प्रोजेक्टसाठी मालदीवला जाते. कथेला धक्कादायक वळण मिळते जेव्हा वर फोटोग्राफरचा मृत्यू होतो. या सिरीजमध्ये आशा नेगी, राजीव सिद्धार्थ, अपेक्षा पोरवाल आणि साहिल सलाथिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अ ट्रु जेंटलमन
अ ट्रु जेंटलमन या चित्रपट एका पुरुष एस्कॉर्टच्या जीवनावर आधारित आहे. प्रेमात पडल्यावर या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. त्यामुळे त्याला त्याची जीवनशैली बदलण्यास भाग पाडलं जातं. अ ट्रु जेंटलमन चित्रपट 26 सप्टेंबरला Netflix वर प्रदर्शित झाला आहे.
सारिपोधा संनिवरम
नानी दिग्दर्शित सारिपोधा संनिवरम चित्रपटाची कथा नायक दयानंद उर्फ दया यावर आधारित आहे. हा एक तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये नायक एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात ठाम उभा राहतो. विवेक अथरेया लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात एसजे सूर्या आणि प्रियांका मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.