नवी दिल्ली, दि.२६। प्रतिनिधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने त्यांची ८ तास चौकशी केली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या एका आयएएस अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान सिसोदिया यांचे नाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारला फायदा होणार नाही आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल अशी मद्य पॉलिसी सिसोदिया यांनी बनवली होती, असे अधिकाऱ्याने चौकशीत सांगितले. अधिकाऱ्याने सिसोदिया यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोपही केला. सीबीआयने समोरासमोर बसवून सिसोदिया आणि अधिकाऱ्याची चौकशी केली असता त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. हेच सिसोदिया यांच्या अटकेचे कारण ठरले आहे. चौकशीत सहभागी होण्यापुर्वी सिसोदिया यांनी आईची भेट घेतली. यानंतर रोड शो करत ते सीबीआय कार्यालयात पोहोचले होते.
यावेळी सिसोदिया यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक होते. आपच्या कार्यकर्त्यांचा वाढता विरोध पाहून पोलिसांनी कलम १४४ लागू केले. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी समर्थकांना संबोधित केले.
भगतसिंग हे देशासाठी शहीद झाले होते, खोट्या आरोपाखाली तुरुंगात जाणे ही माझ्यासाठी छोटी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा मी टीव्ही चॅनलमध्ये होतो. चांगला पगार होता, अँकर होतो. आयुष्य छान चालले होते. सर्व काही सोडून केजरीवाल यांच्यासोबत आलो. झोपडपट्टीत काम करू लागलो. आज जेव्हा ते मला तुरुंगात पाठवत आहेत, तेव्हा माझी पत्नी घरी एकटी असेल. ती खूप आजारी आहे. मुलगा विद्यापीठात शिकतो.