मुंबई, दि.२७। प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी विधीमंडळातील हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून नाराजी व्यक्त केली आहे. सरोज अहिरे आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आल्या आहेत. मात्र गैरसोय पाहून त्यांनी अधिवेशन सोडून नाशिकला जाण्याचा इशारीही त्यांनी दिला आहे. याबाबत बोलतांना सरोज अहिरे यांना अश्रू अनावर झाले. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे देखील अधिवेशनासाठी आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह मुंबईत दाखल झाल्या आहेत. नागपूरच्या अधिवेशनात सरोज अहिरे यांना हिरकणी कक्ष देण्यात आलं होते. मुंबईमधील अधिवेशनातही त्यांना ते देण्यात आलं, मात्र यावेळी ती फक्त एक नाव बदलेली खोली आहे. या खोलीची अवस्थाही बिकट आहे.
प्रचंड धूळ आणि घाण यामध्ये आहे. माझ्या बाळाला काही दिवसांपासून बरं वाटत नाही. तरीही मी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी इथे आली आहे. परंतु सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही, असं सरोज अहिरे यांनी म्हटलं. आमच्या महिलांच्या समस्या समजू शकत नाही. आज जर हिरकणी कक्षाची व्यवस्था झाली नाही तर मी माझ्या बाळाला घाणेरड्या स्थितीत ठेऊ शकत नाही. त्यामुळे उद्या नाशिकला पुन्हा निघून जाईन, असा इशाराही सरोज अहिरे यांनी दिला आहे. आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून नागपूरप्रमाणे मुंबईच्या विधीमंडळात बालसंगोपनासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती. मागील नागपूर अधिवेशनातही त्या आपल्या लहान बाळाला घेऊन आल्या होता. त्या ठिकाणी त्यांना हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आला होता.