वॉशिंग्टन, दि.१०। वृत्तसंस्था अमेरिकन संसदेत सादर केलेल्या “ॲन्युअल थ्रेट असेसमेंट’ अहवालात भारताच्या शेजारी राष्ट्रांसोबतच्या तणावपूर्ण संबंधांवर गंभीर शक्यता वर्तवल्या आहेत. अमेरिकी गुप्तचर विभागाने वार्षिक धोक्यांचे आकलन करत म्हटले, भारत नेहमीच चर्चेतून प्रश्न सोडवण्याच्या बाजूने होता, पण गेल्या काही वर्षांपासून यात बदल झाला आहे. आता पाकिस्तान व चीनचा सामना लष्करी पद्धतीने करण्याच्या पर्यायांवर मार्गक्रमण करत आहे. शेजारी देशांनी चिथावल्यास भारत लष्करी कारवाई करू शकतो. अहवालानुसार, २०२३ मध्ये भारताला पाक-चीन दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी संघर्ष करावा लागेल. वस्तुत: अमेरिका दरवर्षी जगातील संभाव्य धोक्यांवर अहवाल तयार करतो. भारत-चीन संबंधांचाही हा सर्वात तणावपूर्ण काळ : अमेरिकन अहवालात भारत-चीनमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. यात म्हटले, भारत व चीन द्विपक्षीय चर्चेद्वारे सीमावादाचे निराकरण करत आहेत, पण यात यश मिळताना दिसत नाही. ७० च्या दशकानंतर दोन्ही देशांच्या संबंधांचा हा सर्वात तणावपूर्ण काळ आहे. एलएसीवरील अलीकडच्या हालचाली पाहता असे वाटते की, छोटे- छोटे संघर्ष वेगाने वाढू शकतात. यामुळे युद्धासारखी स्थिती होऊ शकते.
पॉम्पियो यांचा दावा, पुलवामा हल्ल्यानंतर अणुयुद्धाच्या जवळ होते भारत-पाक ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री राहिलेले माइक पॉम्पियो यांनी एका पुस्तकात दावा केला की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतपाक यांच्यात अणुयुद्धापर्यंत स्थिती निर्माण झाली होती. पुस्तकानुसार, “जगाला कदाचित नीट माहीत नसावे की, भारत आणि पाकिस्तान २०१९ च्या फेब्रुवारीत अणुयुद्धाच्या किती जवळ होते. अणुहल्ला होणारच होता. ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही.’ काश्मिरात अशांतता किंवा एखादा अतिरेकी हल्ला पाकवर लष्करी कारवाईचे कारण ठरू शकतो पाकिस्तान व भारतामध्ये या वर्षी तणाव वाढण्याची शक्यता आहे. हा तणाव एखाद्या मोठ्या लष्करी कारवाईचे कारण ठरू शकतो. भारतविरोधी अतिरेकी गटांना पाकचे समर्थन असल्याचा दीर्घ इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाकच्या चिथावणीविरोधात भारत लष्करी बळाचा वापर करेल. याची शक्यता आधीच्या तुलनेत जास्त आहे. काश्मिरात पाकसमर्थित हिंसक कारवाया किंवा भारतात कोठेही एखादा अतिरेकी हल्ला हा मोठ्या लष्करी कारवाईचा फ्लॅशपॉइंट ठरू शकतो. दोन अण्वस्त्रसज्ज्ा ताकदींचा छोटासा संघर्षही संपूर्ण जगाला धोक्यात आणू शकतो.