नाशिक, दि.१०। प्रतिनिधी सिन्नरच्या चोंढी शिवारात दुचाकीवरून थेट कालव्यात पडून बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर सापडला आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल वीस तासांच्या तपासानंतर यश आले आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे हे काही वेळेपूर्वीच घटनास्थळी पोहचले होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात राहणारे गणेश गीते हे कुटुंबासह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकासह स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरु केली होती. मात्र शोध काही लागत नव्हता. आज पालकमंत्री भुसे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला.
कॅनॉलचं पाणी रात्रीच का बंद केलं नाही? कॅनॉलचं पाणी रात्रीच बंद केलं असतं, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता, असं म्हणत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास जवान गणेश गीते यांचा मृतदेह शोधण्यास बचाव पथकास यश आले आहे. गणेश गीते हे पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती आहे. गणेश गिते हे २४ फेब्रुवारीपासून सुट्टीवर आले होते. गुरुवारी गणेश पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी आणि मुलगा अभिराज यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी बाईकने गेले होते. शिर्डीहून परतत असताना नांदूरमाधमेेशर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. मेंढी- ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात ही घटना घडली होती. गणेश यांच्या बाईक ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात पडली. आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले काहीजण धावत घटनास्थळी पोहोचले. त्यानतंर त्यांनी गणेशची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेले. या घटनेनंतर कुंटुबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.