मुंबई, दि.१०। प्रतिनिधी विठ्ठल मंदिरात विनामूल्य सेवा देण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून व्यक्त केली होती. अशातच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी या व्यवस्थेचे संकेत दिल्याने वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये खुशीचे वातावरण आहे. खऱ्या अर्थाने विठ्ठल मंदिर वारकऱ्यांचे असल्याची भावना या निर्णयातून समोर येत असून आम्ही मोफत देवाची सेवा करण्यास तयार असल्याच्या भावना विठ्ठल भक्तातून व्यक्त होत आहेत. राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्यासह गोंदवलेकर महाराज आणि इतर अनेक देवस्थानात भाविकांच्याकडून विनामूल्य सेवा देण्याची व्यवस्था कार्यरत आहे.
यामध्ये अधिकारी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य भाविक मोफत सेवा देत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील वारकऱ्यांच्याप्रती सेवा भाव दाखवत अशी सेवा देण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. अशा पद्धतीची सेवा करण्याची संधी मिळाल्यास राज्यभरातील अनेक गावे आणि विविध धार्मिक संस्थांकडूनही मोफत सेवा देण्याची तयारी दाखवण्यात येत आहे. सध्या विठ्ठल मंदिरात २७२ कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल मंदिर प्रशासन सेवा देत असते. यामुळे भाविकांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी होत असते. एका बाजूला सेवाभावी वृत्तीने राज्यभरातील हजारो विठ्ठल भक्त देवाला मोफत सेवा देण्यास तयार असताना भाविकांच्या पैशाची उधळपट्टी का असा सवाल होत होता.