प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी (Maha Vikas Aghadi) संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात (Gondia) एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाशी झालेल्या युतीबाबत विचारले असता ते बोलत होते. यावेळी पटोलेंनी भाजपवर (Bjp) देखील जोरदार टीका केली.
सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नाना पटोलेंची टीका
गोंदियाच्या पालकमंत्र्यांनी काय बोलावे, हे मला त्यांना सांगावं असं वाटत नाही. सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळं सत्तेचा माज त्यांना आला असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असून तो नेहमी सुरू रहावा, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं, यावर पटोले बोलत होते. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे पटोले म्हणाले.
पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पहाटेला स्थापन झाले होते. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच हा प्रश्न विचारा, असे नाना पटोले म्हणाले. राज्यातील सरकार हे असंवैधानिक असून, राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण पत्रच दिले नसल्याची बाब समोर आली असल्याचे पटोले म्हणाले.