सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आजपासून पाच दिवसांचं उपोषण (Fast) करणार आहेत. बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’मध्ये आमीर खानने साकारलेली रणछोडदास छांछड उर्फ ’रँचो’ ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित होती. या चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, पण आज खुद्द सोनम वांगचुक हेच ‘लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल’ म्हणजेच लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही असं म्हणत आहेत.
मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक व्हिडीओ मेसेज पोस्ट केला होता की लडाखमधील परिस्थिती चांगली नाही. कारण इथल्या सुमारे दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम वांगचुक हे लडाखच्या आदिवासी, उद्योग आणि हिमनद्यांविषयी बोलताना दिसत आहेत. भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत नाजूक इकोसिस्टमचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.