दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी तिवरांची कत्तल; उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार वडोदरा-मुंबई मार्गावर २६८६ तिवरांची कत्तल केली जाणार आहे. त्यातील १००१ तिवरांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्गासाठी वडोदरा-मुंबई मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. हा मार्ग सध्या २६+३२० किमी आहे. विस्तार करुन तो १०४+७०० किमी करण्यात येणार आहे. या मार्गावर तिवरांची झाडे आहेत. या मार्गाच्या विस्तारासाठी तिवरांची कत्तल करणे आवश्यक आहे. मात्र तिवरांची कत्तल करण्याआधी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात याचिका केली होती. हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वडोदरा मुंबई महामार्ग वैतरणा नदीवरुन जातो. या मार्गाचा विस्तार पर्यावरणपूरक करायचा आहे. त्यामुळे सीआरझेड व पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला. या दोन्ही विभागांनी विविध अटी घालून या मार्गाच्या विस्ताराला परवानगी दिली.

केंद्रीय वन विभागाने या मार्गाच्या विस्तारासाठी तब्बल एक लाख रोपांची लागवड करण्याची अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घातली आहे. या महामार्गासाठी विविध विभागांनी अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे वडोदरा मुंबई महामार्गाच्या विस्तारासाठी तिवरांची कत्तल करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली जात आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई- ते दिल्ली या ऐतिहासिक द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा १२ पदरी महामार्ग असणार आहे. गुडगाव-जयपूरसवार्इ माधोपुरअलवार-रतलाम- वडोदरा- आणि मुंबई असा हा मार्ग आहे. भिवंडीतूनही मार्ग जाणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा ङ्कायदा या भागातील नागरिकांना होईल.‘ याशिवाय ‘वडोदरा ते मुंबई या टप्प्यासाठी ४४ हजार कोटींच्या निविदेसही मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *