कोल्हापूर, दि.१९। प्रतिनिधी केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी आयोजित सभेत बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद महाराष्ट्राला घातली आहे. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवला होता. तो पक्ष आता पुन्हा धनुष्यबणासह भाजपसोबत आला आहे. या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. २०१९ मध्ये आपण देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढलो होतो. मोठा फोटो मोदींचा होता, छोटा फोटो उद्धव ठाकरेंचा होता. अनेक वेळा म्हणालो होतो देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडणुका लढत आहोत. मी प्रत्येकवेळी म्हणालो, मोदी देखील सर्व सभेत म्हणाले. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि तोंडाला पाणी सुटलं. सर्व सिद्धांत सोडून शरद पवारांच्या शरणात गेले, अशी टिका अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केली.