निकाल लागला काय?

परवा भारताच्या निवडणूक आयोगाने ठाकरे परिवाराच्या नावाने ओळखली जाणारी शिवसेना राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाचे समर्थन करून त्यांच्या पदरात टाकली. आमदार आणि खासदार यांचे अंकगणित पहाता उद्धव साहेबांकडे १४ आमदार आणि ४ खासदार तर शिंदे साहेबांकडे ४१ आमदार आणि १२ खासदार असा हिशेब निघतो. उद्धव ठाकरे हे ठाकरे परिवारातील पहिले सत्तारूढ व्यक्ती ठरले आहेत. सत्तेच्या जवळ असूनही किंवा सत्तेच्या किल्ल्या आपल्या खिशात असूनही सत्तेच्या खुर्चीवर आरूढ न झालेले दोन लोकनेते आधुनिक भारताच्या इतिहासात आपण पाहिले आहेत. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी यांनी मनात आणले असते तर त्यांना निश्चितच सर्वोच्च सत्तापद मिळाले असते. पण हा महामाणुस सत्तापद तर सोडाच आपल्या शिष्यांच्या सत्तारोहणातही हजर नव्हता.

ही स्थितप्रज्ञता महात्मा गांधी यांना अजरामर करून सोडणारी आहे. त्यानंतर मराठी माणसांवरील अन्यायाला संघटनात्मक रूप देऊन शिवसेना या संघटनेला राजकारणाव्यतिरिक्त इतर अनेक अंगांनी विकसित केलेल्या संघटनेची एकहाती उभारणी करणारा महापुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र बाळासाहेब ठाकरे. आजच्या या दिवसापर्यंत शिवसेनेच्या स्थापनेपासून विचार केला तर किती वेगवेगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात हे पाहिले म्हणजे राजकारणातील काळेगोरे रंग आपली मती गुंग करून टाकतात. १९६० साली आचार्य अत्रे यांच्या जन्मदिवशी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले होते. एका साप्ताहिकाचा संपादक केवळ सहा वर्षांत मुंबईच्या मैदानावर मराठी जनतेला आवाहन करतो आणि ते आवाहन आव्हान समजून हजारो तरुण उस्फुर्तपणे त्या आवाहनाला प्रतिसाद देतात.

ही घटना साधीसुधी नाही. हे पुढील वाटचालीवरून सिद्ध झाले आहे. त्यावेळी मुंबई शहरावर दाक्षिणात्यांचा मोठा प्रभाव होता. हे दाक्षिणात्य मराठी माणसाला कसे डावलतात हे नावानिशीवार मार्मिक साप्ताहिकात छापून आल्यामुळे त्या विचारांची मार्मिकता मराठी जनतेच्या मनात अग्निवर्षा करीत होती. त्यातूनच पुढे शिव आणि सेना या प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेल्या नावात बलाढ्य वाघाचा शिरकाव झाला होता. शिवसेनेच्या जन्मापासून अनेक प्रकारे शिवसेनेचे अस्तित्व केवळ मुंबईतच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर विस्तारु लागले होते. नंतर हळूहळू बाळासाहेब ठाकरे या नावाचा दबदबा आधी महाराष्ट्रात आणि त्यानंतर संपूर्ण देशात निर्माण झाला. मराठी माणसाच्या कल्याणासाठी उभ्या राहिलेल्या शिवसेनेला मुंबई, ठाणे परिसरात प्रतिसाद मिळणे आपसूकच शक्य झाले होते. त्यानंतर ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्त्वाचा अंगीकार करून शिवसेनेची वाटचाल सुरू होती. यानंतर बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या प्रश्नांबरोबरच हिंदुत्त्वाचा नारा दिला आणि हे हिंदुत्व महाराष्ट्रातील जनामनांत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात शिवसेनेचा शिरकाव झाला.

शिवसेनेचा हा प्रवास इतका प्रभावशाली होता की त्याकाळी जनता पक्ष फुटून वेगळा झालेल्या जनसंघाला भारतीय जनता पक्ष स्थापन करावा लागला होता. भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि पहिले अधिवेशन अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात मुंबईतच झाले होते. हळूहळू भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आपली पावले मजबूत करण्यासाठी प्रभावशाली भागधारकाची गरज होती. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला मोठा भाऊ मानून अटल-अडवाणी या जोडीने प्रमोद महाजन या भाजपदूताला बाळासाहेबांकडे पाठविले. हळूहळू विधानसभेच्या १७७ जागा शिवसेनेला आणि ११७ जागा भाजपला या फॉम्यर्ुल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी शिवसेना वर होती आणि भाजप खाली होता. पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीनंतर लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यावर या युतीला पुढील पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहावे लागले. याकाळात भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठी झेप घेतली व दिल्लीची सत्ता मिळवली. अनेक उलथापालथी झाल्या.

२००४ साली पुन्हा काँग्रेसप्रणित सरकार अस्तित्वात आले आणि या सरकारच्या दुसऱ्या कालावधीत अशी काही प्रकरणे घडली की काँग्रेसचे पार बाराच वाजले. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालिन भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि एकहाती विजय मिळवला. यानंतरचा इतिहास भारतीय जनता पक्षाचा आलेख उंचवणारा आणि महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेनेची मोठ्या भावाची भूमिका भाजपकडे देणारा कार्यकाळ ठरला. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या १२२ जागा जिंकून शिवसेनेला लहान भावाची भूमिका देऊन आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले. त्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राचे सत्ताकारण भाजपच्या इशाऱ्यावर चालत होते. म्हणजे आता भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर तर शिवसेना कितीतरी मागे गेली होती.

आता २०१९ साली असा काही पेचप्रसंग निर्माण झाला की, अनेक महिने महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. मग एका भल्या पहाटे पुन्हा देवेंद्रजींनी अजित पवारांच्या सहकार्याने सरकार बनविले. एका रात्रीतच राष्ट्रपती राजवट संपविण्यात आली आणि सकाळी जनतेला जाग येइपर्यंत नवे सरकार स्थापन झाले. त्यावेळची पवार साहेबांची गुगली असेल किंवा नसेल पण राष्ट्रपती राजवट संपल्याबरोबर नवे सरकार आले आणि पवार साहेबांनी पुन्हा खेळी केली. फडणवीसांची सत्ता आली तशीच गेली. त्यावेळी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा आणि ते पद उद्धव ठाकरे यांनीच स्वीकारावे म्हणून पवार साहेबांनी जवळजवळ आदेशच दिला. त्यावेळीच एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाला, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीची सत्ता दिल्लीतील सत्ताधीशांना पसंत असणे शक्यच नव्हते. त्यात भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल त्याच महाविकास आघाडीच्या सरकारला स्वस्थपणे झोपही घेऊ देत नव्हते. २०२१ साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा जो अपमान केला त्यामुळे शिवसेनेत उठाव झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा नसताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि शिवसैनिकांना हरप्रकारे मदत केली आणि त्यांची मने जिंकली. आपल्याच कोषात राहणाऱ्या उद्धव साहेबांना आपल्या पायाखालची वाळू सरकत आहे, याची सुतराम कल्पना आली नाही. त्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर चमत्कारिक पद्धतीने सत्तेची पाटी हाती आल्यावर एकनाथ शिंदे यांना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवसेनेतील राजकारणी तयार झाले.

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण एवढेच की उद्धव ठाकरे साहेब यांची मानसिक आणि शारीरिक प्रकृती त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांनाही भेटण्यास तयार नव्हती. मंत्र्यांना भेटणेही शक्य नव्हते. त्याकाळात एकनाथ शिंदे यांचा दरबार सतत सर्वांसाठी खुला होता. त्यामुळेच उद्धव साहेबांची सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडली. परवाच्या निवडणूक आयोगाच्या निकालाने सत्ताकारणाच्या दह्यातील घुसळून घुसळून काढलेले लोणी एकनाथरावांकडे गेले आणि ताक तेवढे उद्धव साहेबांकडे शिल्लक राहिले. पण सत्ताकारणातील प्यादे आणि जनमानस याचा अंदाज भल्याभल्यांनाही लागत नाही. आता सर्वोच्च न्यायालयात काय होते याचा विचार आपण पुढे करू आणि आजची ही लांबलेली ‘खरीखरी’ येथेच संपवू. जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *