मुंबई, दि.२१। प्रतिनिधी शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.