रायपूर, दि.२६। वृत्तसंस्था छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्ष अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्याचा विचार करत आहे. तर राहुल गांधी यांनी ३२ मिनिटांचे भाषण केले. भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रा, अदानी हिंडेनबर्ग प्रकरण, जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. राहुल म्हणाले- आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहिला, पण लाखो लोक आमच्यासोबत चालले. आम्ही पाऊस, गरमी आणि बर्फात एकत्र चाललो. खूप काही शिकायला मिळाले. पंजाबमध्ये एक मेकॅनिक येऊन मला भेटला हे तुम्ही पाहिले असेल. मी त्याचा हात धरला आणि मी त्याची वर्षांची तपश्चर्या, त्याची वेदना आणि दु:ख ओळखले.
लाखो शेतकर्यांशी हस्तांदोलन करायचो, मिठी मारली की लगेच एक ट्रान्समिशन व्हायचे. सुरुवातीला तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुले आहेत, अडचणी काय आहेत यावर बोलण्याची गरज होती. हा प्रकार दीड महिना चालला आणि त्यानंतर काही बोलायची गरज नव्हती. हात धरून, मिठी मारताच त्यांची वेदना एका सेकंदात समजत होती. काही न बोलता मला काय बोलायचे ते त्यांना समजून यायचे. राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही बोटीची शर्यत पाहिली असेल. मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्या फोटोत मी हसत होतो, पण मनातल्या मनात रडत होतो. मी यात्रा सुरू केली. मी एक तंदुरुस्त माणूस आहे. १०-१२ किलोमीटर सहज धावतो. २०-२५ किमी चालण्यात काय मोठी गोष्ट आहे याचा अहंकार होता.