विद्यार्थ्यांच्या क्रीडा-कौशल्याला आणि संस्कृतीला मिळाला सन्मान
रामटेक ( प्रतिनिधी )शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेक, जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२६ चा भव्य शुभारंभ मातोश्री काशिदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुसेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या क्रीडा-कौशल्याला व सांस्कृतिक जाणिवांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन रामटेक पंचायत समिती चे गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी विजय भाकरे,मुसेवाडीच्या सरपंच भारतीताई बोरजवाडे, उपसरपंच देवेंद्र डोंगरे,सदस्य प्रफुल बरबटे,मातोश्री काशिदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र फाले, विस्तारअधिकारी शालिनी रामटेके व मंजुषा नंदेश्वर तसेच रामटेक तालुक्यातील सर्व केंद्रांतील केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी अशा पारंपरिक व शारीरिक विकासाला चालना देणाऱ्या खेळांचा समावेश करण्यात आला. दुपारी ३ नंतर सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी आपली कला, आत्मविश्वास आणि सृजनशीलता सादरीकरणातून प्रभावीपणे मांडली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह, जिद्द आणि संघभावना पाहण्यास मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विजय भाकरे यांनी केले. क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, तसेच शिस्त, नेतृत्व व आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
एकूणच हा महोत्सव केवळ स्पर्धांचा कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक ऊर्जा अधोरेखित करणारा आणि संस्कृती-क्रीडा यांचा सुरेख संगम साधणारा ठरला.




