विकासकामात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
रामटेक (प्रतिनिधी)नगर परिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यासह दहा प्रभागांतील नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत, पारशिवनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनिता प्रकाश डोमकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी साडेबारा वाजता नगर परिषद रामटेक येथे या भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषद इमारत फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आली होती. पदग्रहणापूर्वी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी शहरातील प्रख्यात अठराभुजा गणेश मंदिरात पूजा-अर्चा करून नगर परिषदेकडे आगेकूच केली. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपरिषद सभागृहात प्रथम अधिकृत पदग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानी राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात लोकशाही व्यवस्थेत प्रशासक आणि लोकप्रतिनिधी ही दोन महत्त्वाची चाके असल्याचे सांगून प्रशासक कार्यकाळात नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्यात मर्यादा आल्या, मात्र आता लोकप्रतिनिधींमुळे प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.
नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी आपल्या भाषणात विरोधकांनी विकासकामात अडथळे न आणता सहकार्य करावे, असे आवाहन केले. सर्वसामान्य कुटुंबातून येऊन नगराध्यक्षपद मिळण्यामागे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या पाच वर्षांत बोलण्यापेक्षा कृतीतून रामटेकचा सर्वांगीण विकास करून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपल्या भाषणात प्रत्येक विकासकाम दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. विकासकामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देऊन शहराच्या अतिक्रमण समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण कायम राहिल्यास शहर विद्रूप होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रकाश उके यांनी केले. यावेळी नगरसेवक आलोक मानकर, प्रभाकर खेडकर, कविता संजय मुलमुले, रोशन चाफले, सुरेखा दिनेश माकडे, आष्टणकर, देशमुख, रजत गजभिये, सुमित कोठारी, अभिषेक डहारे, माणिक ताकोद यांच्यासह पत्रकार व शेकडो नागरिक उपस्थित होते.




