मौदा तालुक्यात सात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे’ ७ मार्च पासून सुरू
प्रत्येकांनी शिबिराचा लाभ घ्यावा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे आवाहन
मौदा प्रतिनिधी: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ या उपक्रमाचा पहिला टप्पा 7 मार्च पासून मौदा तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी महसूल विभागाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एकूण सहा शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान महसूल मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली आहे. या कालावधीत नागरिकांकडून अर्ज स्वीकृती, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि पूर्तता यासारखी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे शिबिराच्या दिवशी नागरिकांना प्रत्यक्ष लाभ तत्काळ देता येईल, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले,
हे अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. मार्च महिन्यात तालुक्यातील दोन महसूल मंडळांसाठी ७ मार्च रोजी कोंढामेंढी आणि १४ मार्च रोजी , धानला येथे शिबिरे आयोजित केली जातील. एप्रिल महिन्यात उर्वरित दोन मंडळांसाठी १० एप्रिल रोजी निमखेडा आणि १७ एप्रिल रोजी खात येथे शिबिरे पार पडतील. २४ एप्रिल रोजी तारसा आणि मे महिन्यात ८ मे रोजी चाचेर आणि १५ मे रोजी मौदा नगरपंचायत येथे शिबिरे आयोजित करण्यात येतील. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यात एकूण सहा शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचणार आहे.
या समाधान शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या १५ महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये विविध दाखले, ७/१२ उतारे तसेच इतर शासकीय योजनांशी संबंधित सेवा समाविष्ट असतील. नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या अभियानासाठी सर्व खासदार, आमदार, पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला, या शिबिराचा प्रत्येकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी केले आहे,




