मुंबई, दि.१२। विशेष प्रतिनिधी बोरिवली पूर्वेतील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कचऱ्याच्या आणि दुर्गंधीच्या साम्राज्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात उद्यापासून ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक विजय वैद्य धरणे आंदोलन करणार आहेत. आता पोकळ ओशासन नको तर त्वरित कारवाई झालीच पाहिजे असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्यासोबत या धरणे आंदोलनाचे नेतृत्व विजय केळकर आणि राजन सावंत करणार आहेत. कचऱ्याच्या तसेच वाहनांच्या पार्किंगच्या समस्येबाबत संबंधितांना वारंवार सांगून आणि पत्रव्यवहार करूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी वाहतूक पोलीस मुंबई महापालिका आणि पोलिसांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. विभागातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि जय महाराष्ट्र नगरचे आम्ही कचरा नगर होऊ देणार नाही असे ठणकावत आज बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन होणार आहे. बोरिवली पूर्वेतील, जय महाराष्ट्र नगर बस स्टॉप जवळ, ‘उपनगर राजाचा मंडप’ या ठिकाणी हे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनास स्थानिक नागरिकांसह ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, विनोदी यादव इत्यादी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हा लढा यशस्वी करण्यासाठी झटणार असल्याचे समजते.