निवृत्तीनंतरही थांबेना जबाबदारी!३१ जानेवारीला सेवामुक्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांना नवे मिशन; महत्त्वाच्या प्रकल्पाची सूत्रे हाती
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या प्रशासनात ठसा उमटवलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इक्बाल सिंग चहल येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची जबाबदारी इथेच संपणारी नाही. निवृत्तीनंतर लगेचच राज्य शासनाने त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाचे मिशन सोपवले असून, प्रशासनातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पासाठी केला जाणार आहे.
इक्बाल सिंह चहल यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर सचिव म्हणून काम पाहिले, तर २२ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. या पदावर कार्यरत असतानाच त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण न्यायालयात सुरू असतानाच शासनाने चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे खनिकर्म विभागाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
दरम्यान, चहल यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा उद्देश पोलीस दलाच्या राहणीमानात सुधारणा करणे आणि त्यांच्या कल्याणाची खात्री करणे हा आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात व्यापक नियोजन, भूसंपादन, विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय, पायाभूत सुविधा विकास, वित्तीय व्यवस्थापन आणि ठरावीक कालावधीत अंमलबजावणी यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी अनुभवी आणि सक्षम नेतृत्वाची आवश्यकता होती.
इक्बाल सिंह चहल यांना प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन तसेच केंद्र आणि राज्य शासनातील विविध संस्थांशी समन्वय साधण्याचा ३६ वर्षांहून अधिक अनुभव आहे. हाच अनुभव लक्षात घेता, ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर १ फेब्रुवारी २०२६ पासून त्यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समकक्ष दर्जा आणि मानांकनाची असणार आहे.
एकूणच, निवृत्तीनंतरही इक्बाल सिंह चहल यांची प्रशासकीय इनिंग सुरूच राहणार असून, राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.




