पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला

पुणे, दि.२८। प्रतिनिधी पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाला आहे. त्यात खातेधारकांच्या ४३९ एटीएम कार्ड्सचे क्लोन तयार करून खात्यांतील १ कोटींहून अधिकची रक्कम लंपास करण्यात आली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, भारती सहकारी बँकेची १ कोटी १५ लाख ७०० रुपयांची रक्कम लंपास झाली आहे. सायबर हल्लेखोरांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या कालावधीत एटीएम कार्ड्सचे क्लोन तयार केले. त्यानंतर सदाशिव पेठ, आकुर्डी, धनकवडी, बाणेर, कोथरुड, नवी मुंबई, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर,वरळी व दिल्ली स्थित एटीएम केंद्रांतून पैसे लंपास केले. पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी एकूण ४३९ एटीएम कार्ड्समधील रक्कम पळवली. यासाठी १ हजार २४७ व्यवहार करण्यात आले. बँकेवर सायबर हल्ला झाल्याची गोष्ट लक्षात येताच बँक प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी बँकेचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे २०१८ मध्ये कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला झाला होता. त्यात सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *