मुंबई, दि. १८ प्रतिनिधी:आज मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली.
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटींनीही भाग घेतला. सकाळी ५ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून या ड्रीम रनला फ्लॅग दाखवण्यात आला. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये अभिनेता आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. ओमर अब्दुला यांनी माहीम इथून यात सहभाग घेतला. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी बऱ्याच काळापासून मुंबई मॅरेथॉनबद्दल ऐकत आहे. मी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहे. तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यावं आणि स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवणं टाळावं. आपण दररोज खेळ आणि व्यायामात भाग घेतला पाहिजे. आमच्यासारखे लोक मुंबईत येतात तेव्हा इथे आधीपेक्षा खूप फरक पाहतात.
मी मुंबईत होतो. मी इथे तीन वर्षे राहिलो. त्यावेळी कोस्टल रोडसारखी पायाभूत सुविधा बांधली जाईल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती. पण ती बांधली गेली आणि जर मुंबईसाठी अशा आणखी गोष्टी बांधल्या गेल्या तर त्याचा फायदा रहिवाशांना होईल.”




