टॉप स्टोरी मुंबई

इथियोपियाच्या टाडू अबाटे डेमे पहिला

स्वप्नांच्या नगरी मुंबईच्या रस्त्यांवर आज वेग आणि जिद्दीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. देश-विदेशातून आलेल्या हजारो धावकांनी टाटा मुंबई मॅराथन २०२६ मध्ये उत्साहात सहभाग घेतला. दमट हवामान आणि तीव्र स्पर्धेचा सामना करत इथियोपियाच्या दिग्गज धावपटू टाडू अबाटे डेमे यांनी शानदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय एलीट पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच डेमे यांनी वेग कायम राखत २ तास ९ मिनिटे ५५ सेकंदात फिनिश लाईन पार केली आणि ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाबद्दल त्यांना ४५ लाख रुपयांची रोख बक्षीस देण्यात आली. केनियाचे लियोनार्ड लांगट दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर इथियोपियाच्या मेरहवी वेल्डमरयम यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
महिला गटातही इथियोपियाचे वर्चस्व कायम राहिले. येशी कालायु चेकोले यांनी २ तास २५ मिनिटे १३ सेकंदांची वेळ नोंदवत आंतरराष्ट्रीय एलीट महिला गटात सुवर्णपदक पटकावले. विशेष बाब म्हणजे महिला गटाच्या तिन्ही पदकांवर इथियोपियाच्या धावपटूंनी वर्चस्व मिळवले.

यंदाच्या मॅराथनमध्ये देशातील एकूण ३६ आघाडीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये २३ पुरुष आणि १३ महिला धावपटूंचा समावेश होता.
इंडियन एलीट गटात कार्तिक कारकेरा अव्वल
भारतीय धावपटूंनीही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. इंडियन एलीट पुरुष गटात कार्तिक कारकेरा सर्वांत वेगवान ठरले. त्यांनी २ तास १९ मिनिटे ५५ सेकंदांची वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. अनीश मगर यांनी २ तास २० मिनिटे ८ सेकंदांची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक मिळवला.
टाटा मुंबई मॅराथन २०२६ ने पुन्हा एकदा सिद्ध केले की ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून जिद्द, समर्पण आणि जागतिक क्रीडा भावनेचा उत्सव आहे.
भारतीय एलीट महिला वर्गात भारताच्या धावपटू संजीवनी जाधव यांनी आपल्या अनुभवाचे दर्शन घडवत २ तास ४९ मिनिटे २ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *