मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:“आज देशात आणि महाराष्ट्रात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरं आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते, ते कुणालाही समजले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर मला व्याख्यान द्यायला आवडेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. आज राज्यात, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे शिसारी आली. बाळासाहेब आज नाहीत हे त्यामुळं बरं झाले, नाहीतर त्यांना वेदना झाल्या असत्या असेही ते म्हणाले. यापुढे मराठीच्या मुद्द्यावर कायम लढत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले. त्यावेळी संजय राऊत आणि अमित ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. बाळासाहेबांना कसे पाहायचे, त्यांना कसे मांडायचे हा प्रश्न अनेकदा उभा राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचित्रकार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर अनेक काही घडायचे, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा.”
आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण-डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
जुनी आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणे हे माझ्यासाठी नव्हते, ते घर सोडणे होते. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. झाले गेले ते आता सोडून द्या एकदा.”
एकदा बाळासाहेब ठाकरे या विषयावर मला व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला मांडायला आवडतील. हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटतात, पण जगाला ते कळलेच नाही असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी यावेळी बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेन असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यावर प्रमोद महाजन यांनी ते शक्य नसल्याचं सांगितलं. त्यावर ‘मी तसं करायला लावेन’ असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले. आज जे हिंदुत्वाच्या नावाने आरडाओरडा करतात त्यांना त्यावेळी ही कल्पनाही नव्हती. आज त्याच लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडला आहे,” असे ते म्हणाले.




