मुंबई, दि. २३ प्रतिनिधी:हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समस्त शिवसैनिकांना अभिवादन केले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध समाजाभिमुख उपक्रम राबवले जाणार असून, मुंबईकरांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या अभियानाच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’च्या धर्तीवर आरोग्य सेवा थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या ‘सायलेंट किलर’ आजारांचे वेळेत निदान करण्यावर विशेष भर दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण राबवले जाईल. याअंतर्गत रुग्णांना सर्व आवश्यक औषधे मोफत देण्यात येणार असून उपचारासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवछत्रपतींच्या गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात येणार असून, किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनाचे काम करणाऱ्या शिवभक्त किंवा स्वयंसेवी संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे मानधन दिले जाईल. किल्ल्यांवर शुद्ध पिण्याचे पाणी, आरओ फिल्टर आणि प्लास्टिकमुक्तीसाठीही विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.
राजकीय परिस्थितीवर बोलताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचे सोनं करत गेल्या साडेतीन वर्षांत शिवसेना घराघरात पोहोचली आहे. आज विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपपाठोपाठ राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरली आहे, याचा अभिमान वाटतो. “एक सामान्य शाखाप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले,” असेही त्यांनी नमूद केले.




